कर के देखो!

एकाच दिवशी दोन अभियान चालवणारे पक्ष खऱ्या अर्थाने जेव्हा सर्वसामान्यांपर्यंत पोचतील तेव्हा या अभियानांना यश येईल. महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी हे ओळखले होते. त्यांच्या पक्षातल्या मंडळींनी ते ओळखले पाहिजे.
देशात दोन पक्ष एकाच दिवशी देशभर भ्रमण करणारे अभियान सुरू करत आहेत. काँग्रेसने भारत जोडो, तर आपने मेक इंडिया नंबर वन हे अभियान सुरु केले आहे. हे दोन्ही पक्ष २०२४ सालातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून तयारी करत आहेत हे नक्की! देशातले प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आतापासून निवडणूक पवित्र्यात आले आहेत.जनतेची सेवा करण्याची फार मोठी इच्छा या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. देशातल्या जनतेचे प्रश्न सोडवणे हे केवळ त्यांचेच काम आहे आणि देशातल्या सगळ्यांना सुखी, समाधानी ठेवण्याचा मक्ता केवळ या सगळ्या पक्षांना दिला आहे, असे त्यांच्या वागण्यातून दिसून येते. राहुल गांधी बेरोजगारी, महागाई अशा विषयांना अनुसरून भारत जोडो यात्रा काढणार आहेत, तर केजरीवाल भारताला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
त्यासाठी देशभरात अभियान चालवणार आहेत. खरे तर स्वत:चे महत्त्व वाढवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. केजरीवाल देशाचे पंतप्रधान म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात आहेत, तर राहुल गांधी यांना काँग्रेसचा निसटलेला जनाधार परत मिळवायचा आहे. सध्या २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण असा प्रश्न चर्चेत आहे. अर्थात २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येणार यात सध्या तरी शंका वाटत नाही. आणि २०२४ सालची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारे जिंकायचीच आहे हा निर्धार असल्याने काही करिष्मा झाला, तरच विरोधक सत्तेत येतील. ते आले, तर पंतप्रधानपदी कोण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने असेल.
आत्ता पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांना आघाडीप्रमुख करा म्हणत असतील, तरी पंतप्रधानपद काँग्रेसशिवाय इतरांना देण्यास ते राजी असतील का? नितीशकुमार मला पंतप्रधान पद नको म्हणत असतील, तरी त्यांची पंतप्रधानपदाची इच्छा लपून राहिली नाही.नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हापासून शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत.सध्या कोठडीत असणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी वर्णी लावली आहे. ठाकरे पंतप्रधान होणार असा त्यांचा आत्मविश्वास होता. शिवाय ममता बॅनर्जी, रेड्डी अशी मोठी यादी पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहे. मात्र बॅनर्जीवगळता लोकसभेत प्रभाव पडेल असा एकही पक्ष नाही. शिवसेना २०२४ सालात २०१९ सालात जेवढे खासदार निवडून आणले तेवढे निवडून आणू शकणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष लोकसभेत ३०० पेक्षा जास्त जागा निवडून आणतील याबाबत शंका आहे. साहजिकच पंतप्रधान कोण होणार हे सांगता येणार नाही, मात्र गुडघ्याला बाशिंग बांधणारी मंडळी आपला गुणफलक वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
केजरीवाल अजून किती दिवस त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानावर(?) टिकतील हे सांगता येत नाही. वीज, पाण्याचे मोफत वाटप किंवा खात्यात १५ लाख रुपये जमा करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खऱ्या अर्थाने विकासाला भिडण्याची क्षमता कोणत्याच राजकीय पक्षात आणि नेत्यात नाही. चुनावी जुमला सगळीच मंडळी करत आहेत. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र त्यावर कोणी बोलायला तयार नाही. फोटोजेनिक आंदोलने केली जातात; पुढे काही होत नाही. तेव्हा एकाच दिवशी दोन अभियान चालवणारे पक्ष खऱ्या अर्थाने जेव्हा सर्वसामान्यांपर्यंत पोचतील तेव्हा या अभियानांना यश येईल. महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी हे ओळखले होते. त्यांच्या पक्षातल्या मंडळींनी ते ओळखले पाहिजे. गांधीजींनी एका कार्यकर्त्याला ‘कर के देखो’ असे सांगितले होते. भाजपविरोधकांना हेच शब्द मंत्रासारखे आहेत, हे नक्की!