अजितदादांच्या बालेकिल्ल्यात बाबा आढावांची पवारांसाठी तुफान बॅटिंग

निवडणुका येतील-जातील, पवार फक्त तुमच्यासाठी उभे
पिंपरी चिंचवड : (Dr. Baba Aadhav On Ajit Pawar) निवडणुका येतील आणि जातील, पण शरद पवारांसारखा माणूस नाही, त्यांना आता कशाचीही गरज नाही, पण ते तुमच्यासाठी उभे आहेत, असे विधान जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी केले. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघांकडून शरद पवारांना मानपत्र अर्पण केले. त्यानिमित्ताने बाबा आढाव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शरद पवार हे अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.
बाबा आढाव म्हणाले की, निवडणुका येतील आणि जातील. पण पवारांसारखा माणूस नाही. ते फक्त पाहतील लोक बरोबर आहेत ना, आता त्यांना कशाची गरज नाही, पण ते आता का उभे आहेत, तर फक्त आपल्यासाठी. तुम्ही भटक्या विमुक्तांनी त्यांचा सन्मान केला, हे तुमचे शहाणपण.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना आढाव म्हणाले की, इंडिया, भारत की हिंदुस्थान यावर वाद सध्या सुरू आहे. लोकांना इथे रोजगार मिळेना, दुष्काळाचे भीषण संकट आहे. लोक शहराकडे वळायला लागलेत, मग काय होणार. माणूस सकाळी कुठे असेल आणि संध्याकाळी कुठे असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवे, १४० कोटी जनताच ठरवेल, कोणाचे काय करायचे, असे बाबा आढाव म्हणाले.
ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचे राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललेय नेमके, आपल्या इथे फक्त सत्तेसाठी सगळे सुरू आहे. आपापसातले किरकोळ मतभेद विसरायला हवेत. माझ्या वयाचा उल्लेख फार करू नका. माझ्या आवाजावरून कळतच असेल, मी खंबीर आहे. आता ऐका, एकजूट व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.