‘डॉ. डी.वाय. पाटील’चा पदवीप्रदान समारंभ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचा १३ वा पदवीप्रदान समारंभाच्या कार्यक्रमाला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात शुक्रवार, दि. २० मे २०२२ रोजी स.११ वाजता हा समारंभ होणार आहे.

प्रसिद्ध उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, पद्मश्री सन्मानित उद्योजक व अध्यक्ष, सकाळ मीडिया ग्रुपचे प्रतापराव पवार यांना मानद पदवी, डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) तसेच डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती व प्रमुख सल्लागार- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर (अभिमत विद्यापीठ) यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एससी.)
ही मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या २६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखांतील २१९१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून, यामध्ये १२ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), १४१६ पदव्युत्तर पदवी, ७५४ पदवी व ९ पदविका या अशा एकूण १० विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर किंवा डॉ. डी. वाय. विद्यापीठाच्या फेसबुक पेजवर पाहू शकता, अशी माहिती कुलसचिवांनी दिली आहे.