ताज्या बातम्यापुणेशिक्षण

‘आठवणीतला श्रीकांत’ने उलगडले नात्याचे पदर ; डॉ. निर्मला सरपोतदार लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे ः बहुआयामी, कामाविषयी समर्पित, हसतमुख, मनमिळावू, व्यावसायिक उत्तमतेचा आग्रह धरणारा, अशी एक ना अनेक बिरुदे ज्यांना लागू पडतात अशा दिवंगत श्रीकांत सरपोतदार यांच्या आठवणी आणि त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये अधोरेखित झाली आणि त्यातून मैत्री अन् नात्याचे विविधरंगी पदर उलगडत गेले.

निमित्त होते श्रीकांत सरपोतदार यांच्या आठवणींवर आधारित डॉ. निर्मला सरपोतदार लिखित ‘आठवणीतला श्रीकांत’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. यावेळी बोलताना प्रबोध उद्योग समूहाचे संचालक मोहन गुजराथी म्हणाले की, कल्याणी कंपनीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करून घेण्यासाठी श्रीकांत सरपोतदार प्रबोधमध्ये यायचे. तो अहवाल परिपूर्ण होण्यासाठी ते जातीने त्या अहवालात गुंतायचे. तो अहवाल बिनचूक होण्यासाठी ते तळ ठोकून असायचे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने तो ज्या ज्या कंपनीच्या संपर्कात आला त्या कंपनीचे आर्थिक स्रोत जास्तीत जास्त सुयोग्य पद्धतीने कसे उपयोगात आणता येईल आणि कंपनीचा फायदा कसा होईल याबाबत तो व्यावसायिक उत्तमतेचा आदर्श उदाहरण होता.

यावेळी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर आणि इलेक्ट्रिकल व्हेईकल विभागाचे प्रमुख राजेश खत्री म्हणाले की, श्रीकांतची आणि माझी पहिली भेट जेसीबी कंपनीत असताना पुण्याच्या प्रकल्पावर झाली. पहिल्याच भेटीत त्याने माझे मन जिंकले होते. अतिशय नम्र, जमिनीवर पाय असलेला एक विश्वासू सहकारी म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. तो माझ्या दृष्टीने माझा तत्त्ववेत्ता, मार्गदर्शक आणि मेन्टॉर होता.

याप्रसंगी सुवेली श्रीकांत सरपोतदार, राजेश नातू, अनिल रानडे, उमेेश झेरे आदींनी श्रीकांत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेले शिरीष सहस्रबुद्धे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीया सरपोतदार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये