कर्नाटकातील महंतांच्या आत्महत्या प्रकरणाचा राजकीय अन् भाविकांच्या दबावाने तपास रेंगाळला

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
बंगळुरू : गेल्या ५० दिवसांच्या काळात कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाच्या दोन मठाधिपतींनी आत्महत्या केली. या आत्महत्या आणि एक महंत डॉ. शिवमूर्ती मुरूघा यांना बाल लैंगिक शोषण प्रकरणात काही दिवसांत अटक झाली आहे. त्यामुले कर्नाटकमध्ये पोलिसांना मठातील घटनांच्या तपासात अडथळे येत आहेत का, असा सवाल निर्माण होत आहे. क्विंट या संकेतस्थळाने त्याबाबत दोन्ही आत्महत्यांच्या घटनांचा तपास करणारे अधिकारी, माजी पोलिस अधिकारी आणि लिंगायत भाविक यांच्याशी चर्चा करून या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला.
सुमारे महिन्यापूर्वी बेळगाव जिल्ह्यामधील नेगीन्हाळ येथील श्री गुरू मडीवालेश्वर मठाच्या महंतांनी आत्महत्या करून इहलोकीची यात्रा संपवली. बाल लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एक महंत डॉ. शिवमूर्ती मुरूघा यांना अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. मठाच्या सेवेकऱ्याला पाच सप्टेंबरला काही तरी अघटीत घडत असल्याचा संशय आला. त्याने दार तोडले त्यावेळी त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
हा केवळ लिंगायत समाजाचा प्रश्न नाही. मतपेढी आणि बहुमताच्या राजकारणाचा मुद्दा वगळता त्याला वेगळे पैलुही आहेत. सर्वधर्मीय मठांमध्ये अंतर्गत वादविवाद असतात. आत्महत्या करणारे दोघेही मठांचे महंत होते. त्यांच्याकडून मोठ्या संस्था चालवल्या जातात. त्यांना शत्रू मानणाऱ्या लोकांकडून त्यांच्यावर आरोप करून महंतांची विश्वासहर्ता कमी करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करायचे असतात.
— एस. एम. जमादार, राजकीय विश्लेषक
तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी आढळली. ‘माझ्या भाविकांनो मला माफ करा. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मला या आयुष्याचा कंटाळा आला होता. या मठाचे भवितव्य भाविकांच्या हाती आहे. मी माझ्या आईची आणि मठाच्या भाविकांची पुन्हा एकदा माफी मागतो, असे त्या चिठ्ठीत लििहले होते.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या महंताच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना कारागृहातून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, बसव केंद्र या स्थानिक संघटनेने या महंतांना दोन महिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केल्याने या घटनेला वेगळे वळण मिळाले. या मंहंताशी असणाऱ्या अनैतिक संबंधांबाबत दोन महिलांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नाव आल्याने हे महंत अस्वस्थ होते, असे मठातील सूत्रांनी सांगितले.
महंत बसव सिध्दलिंग स्वामी यांना दोन महिला त्रास देत होत्या. त्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचे हे एक कारण होते, असे एका भक्ताने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर बेळगावमध्ये सांगितले. तो म्हणाला, मी स्वामीजींना गेल्या १० वर्षापासून भेटत आहे. ते अस्वस्थ असल्याचे मला यापूर्वी कधी दिसले नव्हते. यावेळी मी भेटलो त्यावेळी त्यांच्या लैंगिक संबंधाबद्दल दोन महिला बोलत असलेल्या कथित संभाषणात त्यांचे नाव कसे आले, याबद्दल त्यांनी मला सांगितले.
पोलिसांनी मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याची शक्यता फेटाळून लावत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, रामनगरच्या कंचुगल बंदे मठाचे ४५ वर्षीय महंत बसवलिंग स्वामी यांनी तीन पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या मािहतीनुसार हे महंत हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. बसवलिंग स्वामी यांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे आणि एका महिलेच्या व्हिडिओ चॅटची कथित क्लिप अचानकपणे व्हायरल झाली. त्यात अनोळखी महिला संवाद करत आहे. त्यामुळे या महंतांना पध्दतशीरपणे हनी ट्रॅपमध्ये अडकवले असावे आणि त्यांच्याविरोधात हा पुरावा मठातील प्रभावशाली व्यक्तींनी वापरला असावा, असा कयास आहे.
रामनगरचे पोलिस अधिक्षक के. संतोषबाबू क्विंटला म्हणाले, आम्ही स्वत:हून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. स्वामींच्या व्हिडिओ क्लिप आम्ही जमा केल्या आहेत. त्याचा तपास सुरू आहे. पोलिसांना आणि भक्तांना लििहलेली अशी दोन पत्रे आम्ही जप्त केली आहेत.
बसवलिंग महाराजांचे सेवेकरी अंबरीश कुमार म्हणाले, मी मठात १५ वर्षापासून रहात आहे. दैनिक प्रार्थनेसाठी मी स्वामीजींना मदत करत असे. ते दु:खी असल्याचे त्यांनी कधी दाखवले नाही. व्हिडिओ किंवा स्वामीजींच्या संबंधांबाबत मला काही माहिती नाही. पोलिसांनी सत्य शोधावे आणि सत्य समोर आणावे.