पुणेसिटी अपडेट्स

पालखी सोहळ्यानिमित्त उद्या पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार वाहतुकीस बंद

पुणे | Palkhi Sohala 2022 – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२२ जून) या दिवशी पुणे शहरात होणार आहे. तसंच पालखी आगमन, मुक्काम आणि प्रस्थानानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. पालखी आगमनानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार आहेत.

बुधवारी दुपारनंतर शहरातील प्रमुख रस्ते तसेच मध्यभागातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांना पालखी मार्गाची माहिती व्हावी, यासाठी diversion.punepolice.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. तसंच पालखी सोहळ्याची माहिती टि्वटरद्वारे देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलीस पालखी सोहळ्यात गस्त घालणार असून पालखी सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे, असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्त बुधवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणारे रस्ते पुढीलप्रमाणे- बोपोडी चौक ते खडकी बाजार, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे रस्ता, आरटीओ चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, येरवडा सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (संगमवाडी पूल).

तर जगद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी आगमनानिमित्त आळंदी रस्ता, कळसफाटा ते बोपखेल फाटा, येरवडा मनोरुग्णालय, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट हे रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

उद्या वाहतूकीस बंद राहणारे प्रमुख रस्ते-

रेंजहिल चौक ते संचेती चौक ते गणेशखिंड रस्ता बुधवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) बंद ठेवण्यात येणार आहे. तर शनिवार वाडा गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) रस्ता बंद राहणार आहे. मॉडर्न महाविद्यालय रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मध्यभागातील बंद राहणारे प्रमुख रस्ते-

उद्या वाहतुकीस लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता बंद राहणार आहे. पालखी आगमनानिमित्त नाना, भवानी, रास्ता पेठ परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मागील बाजुचे रस्ते वाहतुकीस खुले करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन वाहतूक पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये