मोचा चक्रीवादळामुळे राज्याला पुढचे 4 दिवस उकाड्यापासून सुटका; ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट

Weather Alert : मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे वाढणारा उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज मोचा चक्रीवादळ धडकणार असल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पाहायला मिळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मोचा चक्रीवादळामुळे 3 महत्त्वाच्या राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून यामुळे पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळणार आहे. यावेळी हवामानात मोठा बदल होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि काही शहरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह नजिकच्या शहरांमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.