“त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे तो म्हणजे…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

पुणे | Ajit Pawar On Shinde-Fadnavis – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट या दिवशी पार पडला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, “खरंतर आता खूपच लवकर खातेवाटप करायला हवं. 17 तारखेला अधिवेशन सुरू होतंय. आज 13 तारीख आहे. अधिवेशनात प्रश्न विचारले जातात. प्रश्नाला उत्तर त्या विभागाचे मंत्री म्हणून संबंधितांचं नाव येतं. पण आता नेमकं काय कारण आहे, हे त्या दोघांनाच माहिती”, असं अजित पवार पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
“त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे, तो म्हणजे ‘लवकरात लवकर’! काल मी टीव्हीवर फडणवीसांचं वक्तव्य ऐकलं लवकरात लवकर खातेवाटप करणार आहोत. एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावाला गेले. त्यांनीही सांगितलं लवकरात लवकर करणार आहोत. 14 तारखेला संध्याकाळी अनेक ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. 15 तारखेला झेंडावंदन होणार आहे. त्यावेळी पालकमंत्रीही असायला हवेत. पण साधारणपणे जे ज्या जिल्ह्यातून आलेत, त्या जिल्ह्यातच झेंडावंदन करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत”, असंही अजित पवार म्हणाले.