‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला ‘ईडी’चा दणका! देशभरात विविध ठिकाणी छापे

लॉटरीतील आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर लॉटरी विक्री प्रकरणी ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.१४) छापे टाकले. तामिळनाडूतील चेन्नई आणि कोईम्बतूरमधील सुमारे 20 ठिकाणी, हरियाणाचे फरिदाबाद, पंजाबचे लुधियाना आणि पश्चिम बंगालचे कोलकाता येथे धडक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
‘ईडी’कडून सुरु आहे लॉटरी घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी
‘ईडी’ सँटियागो मार्टिन आणि इतरांविरुद्ध २०१२ मध्ये नोंदवलेल्या लॉटरी घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. यापूर्वी ईडीने या प्रकरणी तब्बल २७७.५९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यात तामिळनाडूतील मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तांचा समावेश होता. ईडीने मार्टिन आणि त्यांची कंपनी,फ्यूचर गेमिंग सोल्यूशन्स (पी) लिमिटेड (सध्या फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस (पी) लिमिटेड आणि पूर्वी मार्टिन यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली होती.
सरकारी अधिकाऱ्यांच्या संगतमताने लॉटरी घोटाळा
लॉटरी नियमन कायद्याचे उल्लंघन करून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संगतमताने लॉटरी घोटाळा झाला. 1 एप्रिल 2009 ते 31 ऑगस्ट 2010 पर्यंत पारितोषिक विजेत्या तिकिटांचे दावे वाढवून 910.30 कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीर नफा कमावला गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने २०२२ मद्ये अंमलबजावणी संचालनालयाने फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि पश्चिम बंगालमधील त्याच्या विविध उप-वितरक आणि क्षेत्र वितरकांच्या विरोधात 409.92 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली होती. ईडीचा तपास कोलकाता पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लॉटरी (नियमन) कायद्याच्या विविध तरतुदींनुसार नोंदवलेल्या खटल्यांवर आधारित आहे.
राजकीय पक्षांना दिली सर्वाधिक १,३६८ कोटींची देणगी
मार्टिन यांच्या फर्मने २०१९-२०२४ दरम्यान इलेक्टोरल बाँडस्च्या (Electoral Bonds) माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक १,३६८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांना लॉटरी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून बेकायदेशीर आर्थिक नफा मिळवल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.
कोण आहे मार्टिन सँटियागो?
सँटियागो मार्टिन यांनी डिसेंबर १९९१ मध्ये स्थापन झालेल्या फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी कोईम्बतूर येथे केली होती. मार्टिन सँटियागो यांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ट्रेडिंग सुरु केले. काही वर्षांमध्ये त्यांनी देशभरात लॉटरी व्यवसायाचा विस्तार केला. त्यांचा व्यवसाय संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. विशेषतः दक्षिणेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्यवसायाचे जाळे आहे. त्यांनी सिक्कीम, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि म्यानमारमध्येही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. लॉटरी व्यतिरिक्त मार्टिन यांचा रिअल इस्टेट, बांधकाम, अल्टरनेटिव्ह एनर्जी, व्हिज्युअल मीडिया एंटरनेटमेंट, वस्त्रोद्योग, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा, शिक्षण, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान, मालमत्ता विकास, कृषी, ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि बांधकाम साहित्य या क्षेत्रात व्यवसाय आहेत.