‘एकनाथ खडसेंचं थोडं संतुलन बिघडलेलं आहे…’- गिरीश महाजन
पुणे : आज पुण्यात पत्रकारपरिषदेत भाजपा आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं महाजन यांनी म्हटलं आहे. सोबतच मशिंदींवर भोग्या संदर्भात देखील त्यांनी भाजपाची भूमिका मांडली आहे.
यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले, “प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका असते, आमची भूमिका आम्ही वेळोवेळी मांडलेली आहे. मशिदींवरील भोग्यांबाबत सर्वोच्च न्यायालायने अगोदरच निर्णय दिलेला आहे. आमची भूमिका याबाबतीत स्पष्ट आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमची भूमिका मांडलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलेलं आहे की, ध्वनिप्रदूषण झालं नाही पाहिजे. आता या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे, आता त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही पाहू.”
पुढे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, “मला निवडून येऊन सहा टर्म झाल्या आहेत. एकनाथ खडसेंना देखील सहा टर्म झाल्या आहेत. पण तरी मी पक्ष मोठा केला, मी पक्ष मोठा केला असं ते सांगतात. खडसेंना म्हणा तुम्ही आम्हाला मोठं केलं की पक्षाने तुम्हाला मोठं केलं. खडसे पक्षापासून वेगेळे झाले. त्यांच्या मतदार संघाचे जिथे ते स्वत: राहतात तिथली सात लोकांची ग्रामपंचायत देखील ते निवडून आणू शकत नाहीत. त्यांच्या मतदार संघातील मुक्ताईनगर नगरपालिका आहे, तिथे देखील भाजपाचा अध्यक्ष आहे. परवा झालेल्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. त्यांची मुलगी विधानसभा निवडणुकीला उभी राहिली, तर ती देखील पडली. एवढी मोठं मोठी पदं तुमची लायकी नसताना तुम्हाला दिली ना? आता तुम्ही पक्ष सोडून गेलात, एखाद्या ठिकाणी बोंब पाडा निवडून या आणि मग सांगा मी पक्ष मोठा केला, मी पक्ष मोठा केला. स्वत:चीच पाठ स्वत:च्या हाताने थोपटून घ्यायची आणि काहीतर बोलायचं. मी अगोदरच सांगितलं आहे की त्यांचं थोडं संतुलन बिघडलेलं आहे. मी त्यांना जेवढं ओळखतो तेवढं कोणी ओळखत नाही. परंतु मला त्यांच्याबद्दल फार काही बोलयाचं नाही.”