“माध्यमांनी आम्हाला शिवसेना म्हणायचं”; शिंदे गटाचे पत्रक, शिवसैनिकांना निर्णय मान्य?
मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. निवडणुकीच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह आम्हाला मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदे गट असा उच्चार न करता, ‘शिवसेना’ असं उच्चारावं, अशा प्रकारचे पत्रच शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेनेतला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या वादाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय अनेक दिवस प्रलंबित होता. त्यानंतर आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह दिलं आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल हे चिन्ह दिलं.
या चिन्हांवर आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व इथल्या जागेसाठीची पोटनिवडणूक झाली. यानंतर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यामुळे हे पत्रक काढल्याचे एकंदरीत समोर आलं आहे. पण सामान्य शिवसैनिकांना हा निर्णय मान्य नसल्याचे दिसून येत आहे. माध्यम शिंदे गटाला शिवसेना या नावाने संबोधित करतीलही पण हे शिवसैनिक हा नावाला कितीपत प्रतिसाद देतील हे देखील पाहावं लागणार आहे.