सिटी अपडेट्स

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षांची निवड

पिंपरी : एकीकडे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षांची निवड शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

यामध्ये पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी रमा नितीन ओव्हाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता लहू कोकणे आणि भोसरी विधानसभा अध्यक्षपदी ज्योती सागर तापकीर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर महिलाध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली असून या नियुक्त्या राष्ट्रवादीची शहरात ताकद वाढवणार आहे, असे यावेळी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी म्हटले आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात महिला संघटन मजबूत केले जाणार आहे, असे कविता आल्हाट यांनी सांगितले. महिला संघटन आणि एकजुटीची ताकद आम्ही आगामी महापालिका निवडणुकीमध्ये दाखवून देऊ, असा विश्वास नवनियुक्त महिला विधानसभा अध्यक्षांनी यावेळी बोलून दाखविला. प्रत्येक विधानसभा कार्यक्षेत्रात महिलांच्या संघटनशक्तीच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ असेही नवनियुक्त महिला विधानसभा अध्यक्ष नियुक्तीनंतर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये