उद्यमगौरव आणि सेवागौरव पुरस्कारांची घोषणा

शेठ चिमणलाल गोविंददास मेमोिरयल ट्रस्टतर्फे…
निवड समिती
पुरस्कारांचे पंचविसावे वर्ष आहे. पुरस्कारांची निवड पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे महासंचालक प्रशांत गिरबाने, दी पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया व ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट या निवड समितीने केली.
पुणे | शेठ चिमणलाल गोविंंददास मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी देण्यात येणार्या उद्यमगौरव आणि सेवागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा स्व.चिमणलाल गोविंंददास उद्यमगौरव पुरस्कार ऊर्ध्वम्ए न्व्हार्न्मेटल टेक्नॉलॉजीज प्रा. लिं.चे संचालक राहुल बाकरे यांना, शिक्षण क्षेत्रासाठीचा स्व.चिमणलाल गोविंंददास सेवागौरव पुरस्कार सातारा जिल्ह्यातील वीर येथील अस्तित्व प्रतिष्ठानच्या संस्थापक गीतांजली देगावकर यांना, तर आरोग्य क्षेत्रासाठीचा स्व.चिमणलाल गोविंंददास सेवागौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील संकल्प वसतिगृह या आदिवासी पारधी समाज विकास संस्थेचे संस्थापक विजय भोसले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती शेठ चिमणलाल गोविंंददास मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे जयंत गुजराथी आणि डॉ. नलिनी गुजराथी उपस्थित होते.
मोहन गुजराथी म्हणाले, यंदा या पुरस्कारांचे पंचविसावे वर्ष असून, पुरस्कारांची निवड करण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे महासंचालक प्रशांत गिरबाने, दी पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट यांची निवड समिती स्थापन करण्यात आली होती. प्रत्येकी रुपये एक लाख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. लवकरच याचे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
ऊर्ध्वम्ए न्व्हार्न्मेटल टेक्नॉलॉजीजने बोअर चार्जर या नावाचे स्मार्ट, पेटंट प्राप्त झालेले आणि पावसाच्या पाण्याचे कूपनलिकेत पुनर्भरण करणारे आधुनिक तंत्र विकसित केले आहे. त्यात पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक राहुल बाकरे यांचे योगदान मोलाचे आहे. कंपनीने आतापर्यंत अठराशेपेक्षा अधिक कूपनलिकांचे जल पुनर्भरण केले आहे. यामुळे ९२३ शेतकर्यांना त्याचा लाभ झाला असून शेतकरी, उद्योजक आणि अन्य संस्था मिळून ८५ हजारपेक्षा जास्त व्यक्तींनी या तंत्रज्ञानाचा फायदा घेतला आहे. देशातील महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओरिसा, हरियाणा अशा आठ पेक्षा जास्त राज्यांत, तसेच पश्चिम आफ्रिकेतही कंपनीने या नवीन तंत्रज्ञानाची सेवा पुरवली आहे.
गीतांजली देगावकर यांनी २००३ मध्ये अस्तित्व प्रतिष्ठानची स्थापना केली. खेड्यापाड्यातील ऊसतोड कामगार, भटके-विमुक्त, गरीब, एकल पालक, धरणग्रस्त विस्थापित व्यक्ती यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि निवारा यांच्या सुविधा देण्यासाठी अस्तित्व गुरुकुल ही निवासी शाळा सुरू केली. सध्या शाळेत ८५ हून अधिक विद्यार्थी असून शाळा आणि वसतिगृहासाठी ९५०० फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना आनंददायी जीवन शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाचनालय, संगणक आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अस्तित्व प्रतिष्ठानतर्फे महिला आणि गावातील तरुणांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले जातात.
जन्मतःच गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आदिवासी पारधी समाज आजही घोर दारिद्य्र, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या जोखडात अडकलेला आहे. या समाजातील मुले गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून विजय भोसले यांनी २००५ मध्ये संकल्प वसतिगृह स्थापन केले. वसतिगृहात सध्या चाळीस विद्यार्थी राहत असून, ते गावातील शाळेत शिक्षण घेतात. संस्थेला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. मुलांचा व्यक्तिगत विकास व्हावा या दृष्टीने या ठिकाणी विविध सांस्कृतिक उपक्रम होतात आणि क्रीडा सुविधा दिल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांच्या सुविधा पुरवून त्यांना नोकरी आणि व्यवसायासाठी लागणारी कौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.