
Rashtrasanchar Investigation |
पुणे : आपल्या पदाचा दुरुपयोग करणारे लोकप्रतिनिधी आपण अनेकदा पाहतो. परंतु सार्वजनिक व्यवस्थेलादेखील झुगारून तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांची शाळा एक आठवड्यापासून बंद पाडण्याचे दुष्कृत्य माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केले आहे. माजी आमदाराच्या या दबंगगिरीपुढे पालकांनीही आता हात टेकले असून संपूर्ण परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
कोंढवा परिसरातील सिंहगड सिटी स्कूलच्या परिसरात हा प्रकार सुरू आहे. मनमानी करत या शाळेच्या प्रवेशद्वारावरील रस्ते खोदकाम करून बंद केल्याने तेथे कुठल्याही विद्यार्थ्याला जाता येत नाही. टिळेकर यांनी दोन्ही बाजूला पत्रे लावून हा रस्ता चक्क बंद केला. शाळेला जाणारा हा रस्ता आपल्या खासगी जागेतून जात असल्याने तो बंद केला असल्याचे सांगितले जात आहे.
पाच ऑगस्टपासून येथे शिकणारे साडेतीन हजार विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत. ही शाळा पूर्णपणे बंद आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुण्याच्या इतिहासात पुढाऱ्याच्या दादागिरीमुळे प्रथमच इतके दिवस एखादी शाळा बंद पडल्याची पहिलीच घटना असावी.
पुणे शैक्षणिक मूल्यांची भूमी आहे. देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून पुण्याच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून पुण्याच्या विद्यापीठांसह येथे शिक्षण संस्थांनादेखील एक मोठी परंपरा आहे परंतु, या संपूर्ण व्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधींवर आहे. त्यांनीच कधीकधी आपल्या वैयक्तिक स्वार्थामुळे ताळ सोडला तर ते व्यवस्थेचे कसे ‘तीन तेरा ‘ वाजवू शकतात आणि आपला अहंकारामुळे समाजाला कसे वेठीस धरू शकतात, याचे उदाहरण सध्या योगेश टिळेकर यांनी दाखवून दिले आहे.
रस्ता खासगी जागेतून
या शाळेला जाणारा रस्ता हा खासगी जागेतून जात आहे, त्यामुळे जागामालकाला तो रस्ता बंद करायचा अधिकार आहे, असा अजब तर्क काही महापालिका अधिकाऱ्यांनी लावला, परंतु जर हा रस्ता बेकायदेशीर असेल तर गेल्या पंधरा वर्षांपासून वापरातील रस्ता, तसेच या संस्थेला देण्यात येणाऱ्या सुविधा महापालिकेने कशा दिल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय मार्ग बंद करण्याचे असे समर्थन होऊ शकत नाही. चौथा आणि टिळेकर यांचे हे प्रकरण प्रसंगी पोलिसांनी सोडवावे, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये, अशी सामान्य पालकांची अपेक्षा आहे.
चार ऑगस्टपासून टिळेकर यांनी हा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्कूल बस आत जात नाही, कुठल्याही विद्यार्थ्यालाही आत जाता येत नाही. पूर्व बाजूचा रस्ता त्यांनी आधीच बंद केला होता. आता पश्चिम बाजूलाही पत्रे लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. शाळा व्यवस्थापन आणि टिळेकर यांचे काही मतभेद असल्याचे समजते. परंतु या वादामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने समन्वयाची भूमिका घेऊन आपले वाद न्यायालयात सोडवू, पण शाळकरी मुलांचे नुकसान होऊ देऊ नका, अशी विनंती केली. त्यालाही झुगारून टिळेकर यांनी हा रस्ता बंदच ठेवला.
गेला आठवडाभर अधिक दिवसांपासून हा वाद सुरू आहे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून आम्ही आता शेजारच्या टेकडीवरून एक पायवाट काढली असून कसे तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे धोकादायक असले तरी शाळा सुरू करण्यासाठी आम्हाला हे करावे
लागत आहे.
— श्री. सावंत, कॅम्पस डायरेक्टर, सिंहगड
गुरुवारी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही टिळेकर यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. आता सिंहगड स्कूलने शेजारी एका टेकडीवजा रस्त्यावरून एक छोटी पायवाट केली असून अत्यंत धोकादायकरीत्या येथून विद्यार्थी शाळेच्या गेटमध्ये प्रवेश करीत आहेत ते समजते. गुरुवारी तिथे पोलीस बंदोबस्तदेखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. परंतु कुठलाही सर्वमान्य तोडगा न निघाल्यामुळे हे प्रकरण आहे तसेच आहे. सिंहगड पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापकाने पालकांना विश्वासात घेऊन ही परिस्थिती सांगायला हवी होती, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. तर टिळेकर यांच्या या कृतीने मात्र पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.