पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन
लाहोर | पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे वयाच्या 79 वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार मुशर्रफ दीर्घकाळपासून आजारी होते. 2016 पासून दुबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना ‘अमायलोइडोसिस’ हा आजार होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले होते. अमायलोइडोसिस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. या आजारामध्ये मानवी शरीरात अमायलोइड नावाचे असामान्य प्रथिने तयार होऊ लागतात. हृदय, मूत्रपिंड, यकृत, मज्जासंस्था, मेंदू इत्यादी अवयवांमध्ये ते जमा होऊ लागते. त्यामुळे हे अवयव काम करू शकत नाहीत.
कारगिल युद्धात जनरल मुशर्रफ यांचा थेट सहभाग होता. परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. तसेच ते निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील होते. माजी निवृत्त जनरल परवेज मुशर्रफ यांनी लष्कराप्रमुख असताना बंड करुन पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन 3 नोव्हेंबर 2007 साली देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.
परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावरच्या उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर ही शिक्षा लाहोरच्या उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.