डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकरी चिंतेत
ट्रॅक्टरचा मशागतीचा खर्च वाढला
रांजणी : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा फटका शेतीव्यवस्थेला बसत आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले. सध्या महागाईच्या भडक्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता होरपळली जात असून तसेच हातावर पोट असणार्या मोलमजुरी करणार्या मजुरांचे जीवन जगणेदेखील अवघड झाले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम शेतीवरदेखील होतो. इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने काम करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेती सोडून दिलेली बरी, असे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
महागाई वाढल्यामुळे देशातील सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. मिळणार्या उत्पन्नात वाढत्या महागाईला कसे सामोरे जायचे, हा प्रश्न सामान्य माणूस, शेतकरी यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे शेतीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शेती करताना येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ करणे शक्य होत नाही. कोरोना संकट, वाढती महागाई आणि अवकाळीचा फटका शेतीला व शेतकर्यांना बसत आहे. शेतीला पूरक व्यवसाय करण्याकडे शेतकरीवर्गाने लक्ष दिले पाहिजे. दूूध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय या जोडधंद्यांकडे त्यांनी वळले पाहिजे.
_सुनील गोडसे, शेतकरी, खैरेवाडी, ता. शिरूर
दरवर्षी खराब हवामानाचा शेतीला फटका बसू लागला आहे, तसेच मजुरीही वाढली आहे. पेरणीपासून पीक काढणीपर्यंत खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ठ्या कमकुवत झाला आहे. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने यंत्राद्वारे शेती करणेही महाग झाले आहे. वर्षभराचा खर्च एकरी पाच ते दहा हजारांपर्यंत गेला आहे. यामुळे शेती कशी करायची, किती उत्पन्न मिळवायचे याचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती करतानाचा खर्चाचा ताळमेळ बसविताना बळीराजाला नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना संकट, तसेच अवकाळी अतिवृष्टीमुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेतीतून काहीच उत्पन्न हाती आले नाही. त्यातच आता मजुरीचे दरही वाढले असून चारशे ते पाचशे रुपये देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी डिझेलचा लिटरचा दर ७५ रुपयांच्यादरम्यान होता. आता हाच डिझेलचा दर १०५ रुपयांपर्यंत गेला असून त्यामुळे ट्रॅक्टर व्यावसायिकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. कमी वेळात जास्त काम आणि जलदगतीने व्हावे, म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असतात.