ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अली जनाब उद्धव ठाकरेंना शोभतं का?” मालेगावातल्या बॅनरवरून देवेंद्र फडणवीसांचा सवाल

नाशिक : (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राज्यभर विभागवार सभा घेत आहेत. त्यांच्या पक्षाचे शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. पक्षाच्या पडझडीच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, निष्ठावंतांना एकसंघ ठेवण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. अलिकडेच त्यांनी कोकणात खेड येथे मोठी सभा घेतली. त्यानंतर आता त्यांची दुसरी जाहीर सभा आज (दि. 26 मार्च रोजी) नाशिकच्या मालेगावात होणार आहे.

शिवसेनेनं मालेगावात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी केली आहे. ठाकरेंच्या समर्थनार्थ मालेगावात ठिकठिकाणी सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव हा मुस्लीमबहूल भाग आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने या बॅनरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मालेगावातील सभेच्या उर्दू बॅनरवरून (Urdu banner) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटलं तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.”

फडणवीसांच्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याबाबत म्हणाले की, “एखाद्या भाषेवर या देशात बंदी आहे का? उर्दू ही या देशातली भाषा नाही का? जावेद अख्तर यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाची भूमिका मांडण्याचं काम या भाषेत केलं आहे. सत्ताधारी केवळ लोकांचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालेगावच्या सभेनं लोकांची हातभर फाटली आहे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये