
दौंड | दौंड तालुक्यातील वरवंड येथील पहिल्या महिला सरपंच उषा गणेश दिवेकर यांचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सत्कार केला. त्या सध्या ८२ वर्षांच्या आहेत.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी उषा दिवेकर या राजकारणात आल्या. ऐन तिशीमधे त्या सरपंच बनल्या. महाराष्ट्रातील पहिल्या महिला सरपंच म्हणून त्या ओळखल्या जातात. त्या काळात गावच्या बाजारपेठेतून जाण्यास स्त्रियांना मज्जाव होता. तरीही त्या राजकारणात गेल्या. त्यांच्या कार्यकाळात गावात वीज, पक्के रस्ते, नळवाटे घराघरात पाणीपुरवठा या सुधारणा त्यांनी केल्या. त्याकाळी गावात दवाखाना नव्हता.
त्यांनी गावात सरकारी हॉस्पिटल आणले. त्यासाठी गावठाणातील स्वत:ची जागा विनामूल्य देऊ केली. त्या तालुकास्तरावरही निवडून गेल्या. सहकारी साखर कारखान्यावरही संचालक झाल्या. या काळात त्या कायम शरद पवारांबरोबर होत्या. आजही पवार हेच त्यांचा आदर्श आहेत. आजच्या या जमान्यात अशी निष्ठा मिळणे अवघड आहे.