ताज्या बातम्यापुणे

पुन्हा अनधिकृत फ्लेक्सचा विषय पेटणार!

पुणे : शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ, तर दुसरीकडे विरोधात शहरात ठिकठिकाणी, तसेच अनेक पक्षीय कार्यालयांजवळ अनधिकृत फ्लेक्स लावले जात आहेत. अशा बॅनरबाजीवर सध्या आक्रमक शिवसेनेकडून बंडखोर आमदारांचे फ्लेक्स, होर्डिंग फाडणे तर त्यांची कार्यालये तोडफोड करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरात कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, पुन्हा अनधिकृत फ्लेक्सचा विषय पेटत असल्याचे तोडफोडी आणि राडानंतर दिसून आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने अनधिकृत फ्लेक्स व बॅनर काढण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात अनधिकृत बॅनर, फ्लेक्सचा विषय चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.

सध्या महापालिकेच्या मदतीने शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुठल्याही नागरिकाला शहराच्या वेगवेगळ्या भागात कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग आढळून आल्यास तत्काळ पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.

_अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त (पुणे शहर)

सध्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार तणावात असून, गेल्या आठ दिवसांपासून पुण्यासह विविध ठिकाणी बंडखोर आमदारांचे फ्लेक्स, होर्डिंग फाडण्यापासून त्यांची कार्यालये फोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बेकायदा फ्लेक्स, होर्डिंग हटविण्याच्या प्रकारातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार पुणे पोलिसांच्या मदतीने महापालिकेकडून शहरातील राजकीय व अन्य सर्व प्रकारचे अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग हटविण्यास सुरुवात झाली. महापालिकेने मोजणी केल्यानंतर त्यामध्ये १४०० हून अधिक अनधिकृत फ्लेक्स असल्याचे आढळून आले असून, आठवड्याभरात ते हटविण्यात आले आहेत.

फलकधारकांकडून दीड लाखाचा दंड वसूल
मागील सहा महिन्यांत महापालिकेतर्फे ४ जाहिरात फलक, ३७४८ बोर्ड, ३५२० बॅनर, १५७७ फ्लेक्स, १०६९ झेंडे, ४६४८ पोस्टर, १५०६ किऑक्स, १९५३ इतर अशा एकूण १८ हजार २३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अद्यापपर्यंत जाहिरात फलक निष्कासन कारवाईतून दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, बोर्ड, बॅनर, पोस्टर इत्यादी अनधिकृतपणे लावलेल्या संबंधितांकडून ७ लाख १२ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केल्यानंतर ५० हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकाकडून वसूलसुद्धा करण्यात आला आहे.

शिवसेना नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासमवेत घेऊन बंड पुकारल्यानंतर महाआघाडी सरकार मागील काही दिवसांपासून तणावामध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेची गांभीर्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दखल घेऊन तत्काळ शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडून शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंगची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये १४०० हून अधिक फ्लेक्स आढळले. त्यानुसार संबंधित फ्लेक्स तत्काळ काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवातही केली आहे.

यापूर्वीही तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई
सणसमारंभ, उत्सवांच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जातात. यामध्ये बहुतेकवेळा राजकीय नेतेमंडळी, शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी पुढे असतात. मुंबई हायकोर्टाने त्यावरून अनेकदा महापालिका प्रशासनासह राजकीय पक्षांचेही कान उपटले आहेत. तसेच, दंड भरून घेतला आहे. शहराच्या चौकाचौकांत लागलेल्या अनधिकृत फ्लेक्स-बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडते. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर-आयुक्तांनी यापूर्वी दिल्या आहेत. महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात एक-दोन दिवस कारवाई केली जात असली, तरी त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा चौकांमध्ये होर्डिंग-बॅनरचे पुनरागमन होते.

राज्यात सध्या बंडखोर सेना आमदारांमुळे ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक भूमिकेत जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. फ्लेक्स फाडणे, काळे फासणे, तोडफोड करणे आदी कारणांमुळे कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी अनधिकृत बॅनरवर कठोर कारवाई सुरू केल्याचे यातून दिसून येत आहे. दरम्यान, राजकीय व्यक्तींचे फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग फाडणे, काढण्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने ही कारवाई केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये