माजी नगरसेवक नाना भानगिरे करणार शिंदे गटात प्रवेश

स्थानिक पातळीवरही शिवसेनेत फुटीला सुरुवात
पुणे : राज्यातील घडामोडीनंतर आता स्थानिक पातळीवर शिवसेनेत फूट पडू लागली आहे. शहरातील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुण्यातील शिवसेनेची वाटचाल कोणत्या दिशेने होणार याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
महापालिकेत मुख्यमंत्री शिंदे समर्थक असलेले भानगिरे हे एकमेव नगरसेवक आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात महंमदवाडी प्रभागातून ते निवडून आले होते. याच भागातून त्यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. विधानसभा निवडणूक त्यांनी मनसेकडून लढविली होती.
परंतु मनसेकडून त्यांना यश न मिळाल्याने ते पुन्हा शिवसेनेत आले होते. पुन्हा नगरसेवक झाले, आता ते शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी पुण्यातील शिवसैनिकांनी एका पदाधिकार्याच्या कार्यालयावर असलेल्या फलकावर शिंदे यांचे छायाचित्र फाडले होते. पुणे शहरातील काही माजी नगरसेवकही गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असून, भानगिरे यांनाही शिंदे गटाकडून निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. भानगिरे यांनी त्यांच्या प्रभागात विकसित केलेल्या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले आहे. यामुळे भानगिरे यांची शिंदे गटात सहभागी होण्याची औपचारिकता बाकी आहे. यापूर्वी पुण्यातील शिवसेनेत नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तत्कालीन आमदार विनायक निम्हण यांच्या रूपाने पहिली फूट पडली होती.
शिवसेनेत असताना पुण्यात राज ठाकरे यांचे समर्थकांचे संघटनेवर वर्चस्व होते. परंतु राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसे स्थापन केल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या गटाने शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत पक्ष सोडला होता. आता पुन्हा एकदा शिंदेे समर्थक असलेले काही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील अशी शक्यता असली तरी प्रभावी अशा नेतृत्वाचा यात समावेश नाही.