दिग्गज राजकारणी ते दिग्गज खेळाडू एलाॅन मस्कने कोणालाच नाही सोडलं, सर्वांनाच दिलाय 440 व्होल्टचा झटका
मुंबई | Blue Tick – सध्या ट्विटरवर अनेक बदल होताना दिसत आहेत. एलाॅन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरवर बरेच बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच एलाॅन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता ट्विटरने जगभरातील दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांना मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) पैसे मोजण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच ज्यांना फ्रिमध्ये ब्लू टिक मिळाली आहे त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला होता. तर आता याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
20 एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं एलाॅन मस्क यांनी जाहीर केलं होतं. तसंच या सुविधेचा लाभ आता पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे काल (20 एप्रिल) मध्यरात्री सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. याचा फटका अनेक दिग्गज मंडळींना बसला आहे.
ट्विटरने केलेल्या या कारवाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, प्रियांका गांधी अशा अनेक नेतेमंडळींचा समावेश आहे. तर अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, आलिया भट्ट अशा अनेक सेलिब्रिटींचीही ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
तसंच क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंचीही ब्लू टिक ट्विटरने हटवली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, नीरज चोप्रा, सानिया मिर्झा, हरमनप्रीत कौर अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.