अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

स्त्री रूपातील गणेश

-गणेशानी-वैनायकी नावाने ओळखले जाते स्त्री-रूपातील गणेशाला
-साताऱ्याजवळ पाटेश्वरच्या डोंगरावर आहे पहिली मूर्ती
-सोलापूर रस्त्यावर यवतजवळ भुलेश्वर मंदिरात आहे दुसरी मूर्ती
-दोन्ही मूर्ती गुप्त आणि यादव राजवटीतील.
-देशभरात आहेत आणखी चार मूर्ती

श्रीनिवास वारुंजीकर

श्री गणेशाची विविध रूपे आपण नेहमी पाहतो. गणेशोत्सवावेळी सार्वजनिक मंडळांमध्येही विविध रूपांतील गणेशाचे दर्शन आपल्याला घडते. श्रीगणेशाची मूर्ती स्त्री रूपात असू शकेल, अशी कल्पनाही आजवर कोणी केली नसेल; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या दोन गणेश मूर्ती पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर आढळून येतात. स्त्री रूपातील गणेशाला ‘गणेशानी’ किंवा ‘वैनायकी’ या नावाने ओळखले जाते. गणेशानी आणि वैनायकीचे उल्लेख ललितास्तोत्रामध्येही आढळतात.
इसवी सन ५५० म्हणजे किमान १७०० वर्षांपूर्वी अशा गणेशानी अथवा वैनायकीची शिल्प महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात साकारली गेली आहेत. त्यांपैकी एक आहे सातारा शहराजवळील पाटेश्वराच्या डोंगरातील शिवमंदिर आणि दुसरे ठिकाण आहे सोलापूर रस्त्यावरील यवत गावाजवळील भुलेश्वर मंदिर.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : गाणपत्य सांप्रदायाची लोकप्रियता गुप्त काळापासून वाढू लागली आणि पुढील काळात तिने उच्चांक गाठला. गुप्त काळापर्यंत गणेशाची वेगळी, स्वतंत्र मंदिरे नसत; तर गणेशाचे स्थान दरवाजाच्या चौकटीपुरते किंवा पूजेच्या आरंभी पूजनापर्यंतच मर्यादित होते. मध्य काळापर्यंत गणपतीची लोकप्रियता शिगेला पोहोचली आणि गणेशाची स्वतंत्र मंदिरे उभारण्यास सुरुवात झाली.

गुप्तकाळातील मातीच्या ठशांवर लक्ष्मी आणि धन देणारे यक्ष यांच्यासोबतच कुबेर आणि गणपतीच्या प्रतिमा आढळून येतात. मध्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये सप्तमातृका पट्ट अनेक ठिकाणी आढळतात. यामध्ये गणेशी किंवा गणेशानी अर्थात वैनायकीच्या प्रतिमा दिसतात. गणेशानीचा सर्वांत पहिला आढळ हा झाशीच्या राणीच्या महालातील एका शिलापट्टात आहे. काय आहे गणेशानी? गणेशानी किंवा वैनायकी हे प्राचीन वाङ्मयातील प्रचलित नाव आहे. श्रीगणेशाला गजमुखी युवतीच्या रूपात शिल्पित केल्याचे उल्लेख आढळतात. स्कंद पुराणात काशीखंडात समाविष्ट असलेल्या ६४ योगिनींच्या नामावलीत श्रीगणेशाच्या युवती रूपाचा उल्लेख आहे. तर मत्स्य पुराणात दोनशे देवींच्या नामावलीत वैनायकीचा उल्लेख येतो. श्रीदेवी सहस्रनाम स्तोत्रामध्ये या देवतेस गणेशानी, वैनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी या नावांनी संबोधले आहे.

शक्ती गणपती म्हणजे गणेशानी शिल्परत्न या प्राचीन ग्रंथात गणेशानीचे शिल्प कसे घडवायचे याची माहिती येते. गणेशानी आणि वैनायकी या देवतेस या ग्रंथात शक्ती गणपती म्हणून संबोधले आहे. वैनायकीच्या शिल्पनिर्मितीचा आरंभ गुप्त काळापासून झाला असून, मध्य युगात त्यावर तांत्रिक शक्तिपूजक संप्रदायाचा प्रभाव पडून शक्तिरूपी गणेश पूजनाचे महत्त्व वाढल्याचे दिसते. त्यातूनच पूजनासाठी आणि मंदिरात स्थापनेसाठी वैनायकीची शिल्प निर्माण झाली असावीत. पाटेश्वर मंदिर येथील गणेशानी सातारा शहराच्या जवळच देगाव (एमआयडीसी क्षेत्र) या गावाजवळ पाटेश्वराचा डोंगर आहे. येथे प्रसिद्ध शिवमंदिर आणि अन्य शिल्पसमूह असून, येथे प्राचीन काळी सप्तर्षी ऋषींचे भूगोलविषयक संशोधन केंद्र होते. येथील मुख्य मंदिराच्या सभामंडपातून गर्भगृहाकडे जाताना पूर्वाभिमुख असलेल्या देवकोष्टात एक गणेशानीची मूर्ती आहे. किमान ४५ सेंमी रुंद आणि ७५ सेंमी उंच शिल्पखंडावर ही गणेशानी सुखासनात बसलेली असून, ती पूर्णावयवी आहे. रेखीव आणि चतुर्भुज गणेशानीच्या मागील उजव्या हातात परशू व डाव्या हातात कमळाच्या कळीचा देठ आहे. पुढच्या उजव्या हातात दात-मुळा असून, डाव्या हातात मोदकपात्र आहे. डाव्या सोंडेचे टोक वळसा घालून मोदकांवर विसावले आहे. या मूर्तीचा कालखंड हा इसवी सन ५५० ते ६४२ असावा.

भुलेश्वर मंदिर येथील वैनायकी पुण्यापासून जवळच ५० किमी अंतरावर, सोलापूर रस्त्यावर यवत येथे भुलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. बाराव्या शतकातील या मंदिरात भुलेश्वराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस, वरच्या बाजूला वैनायकीची शिल्प आढळतात. येथील वैनायकी पद्मासनात बसलेली असून, ती सालंकृत आहे. येथे वेरुळप्रमाणे सप्तमातृकांचे पूर्ण शिल्पपट्ट नाहीत; मात्र, तीन-तीनच्या मातृका पट्टात वैनायकीचे शिल्प आढळते. या येथे भगवान श्री शंकराचीही स्त्री रूपातील शिल्प आढळतात. पार्वती आणि शंकरानी भुलेश्वर येथून कैलासाकडे प्रयाण केले आणि मग तेथे विवाह केला असे मानले जाते. या सर्व मूर्तींचा कालखंड हा तेराव्या शतकाचा (इसवी सन १२३०) आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेरचे संग्रहालय आणि भेडाघाट येथील गौरीशंकर मंदिरात गणेशानीच्या मूर्ती आढळून येतात. गणेशानीविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक अरुणा ढेरे म्हणतात – गणेशानीच्या निमित्ताने मी माझे वडील आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी असे लक्षात आले, की कोणत्याही पुरुष देवतेचे स्त्री रूप असल्याशिवाय त्या देवतेला पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यामुळे गणेशाशिवाय अन्य विविध देवतांची स्त्रीरूपे असल्याचे संदर्भ पुराणांत आढळतात.

त्यामध्ये महेशाची (अर्थात महादेवाची) माहेशी, विष्णूची वैष्णवी किंवा नरसिंहाची नारसिंही अशी स्त्री रूपे सापडतात. त्याच धर्तीवर गणेशाची गणेशानी किंवा वैनायकी अथवा लंबोदरी अशी रूपे आहेतच. मुळात तंत्रविद्येची साधना करणारे साधक देवतांच्या अशा स्त्री रूपांची आराधना करताना आढळतात. गणेशाची अशी स्त्री-रूपे हिंदू धर्म ज्या ज्या ठिकाणी पोहोचला त्या सर्व देशांत आढळतात. जपान, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा अशा विविध देशांतही गणेशानीची शिल्पे आढळून येतात. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये