“कुणास ठाऊक कोणाच्या भावना केव्हा दुखावल्या जातील”, गौहर खानचं ट्विट चर्चेत
मुंबई | Gauahar Khan’s Tweet In Discussion – अभिनेत्री गौहर खान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी अनेक विषयांवरती आपलं मत मांडत असते. आताही एका चर्चेत असणाऱ्या मुद्द्यावर तिने आपलं मत मांडत हल्ली लोकांच्या भावना कोणत्याही गोष्टीवरून दुखावल्या जातात असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर-आलिया आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं यूट्यूबवर प्रमोशन करत होते. यादरम्यान रणबीरने आलियाच्या गरोदरपणात वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली. त्यानंतर रणबीर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता. यावर आता अभिनेत्री गौहर खानने भाष्य केलं आहे.
गौहरने ट्विट करत म्हटलं आहे की, “हल्ली लोकं जरा जास्तच संवेदनशील झाली आहेत. आता आपल्या पत्नीची थोडी हलकी फुलकी मस्करी करायलाही बंदी आहे. कुणास ठाऊक कोणाच्या भावना केव्हा दुखावल्या जातील! सगळं थोडं हलक्यात घ्या. तसं झाल्याने जगातल्या अनेक समस्या सुटतील.”
दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनच्या लाइव्ह सेशनदरम्यान आलिया म्हणाली, आम्ही चांगल्या लेव्हलवर चित्रपटाचे प्रमोशन करू, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ. पण सध्या आम्ही जास्त ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण आमचं लक्ष दुसरीकडे आहे. याच दरम्यान, रणबीर आलियाच्या बेबी बंपकडे बोट दाखवत कारण आता कोणी पसरतंय (वजन वाढतंय या अर्थाने) असं म्हणाला. यावरून रणबीरच्या या जोकवर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला चांगलंच धारेवर धरलं होतं.