“संजय राऊत यांनी बाॅम्ब तयार केला होता मात्र तो…”, गिरीश महाजन यांचं टीकास्त्र
नाशिक | Girish Mahajan – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत नेहमी बाॅम्ब आणतात पण ते फुस्के निघतात. त्यामुळे त्यांच्याजवळ बोलण्याशिवाय दुसरं काही नाही. मागच्या वेळीही त्यांनी बाॅम्ब तयार केला होता मात्र तो फुटला नाही, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. ते नाशिक येथील खान्देश महोत्सवाला उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसंच आज (26 डिसेंबर) अधिवेशनात मोठा बाॅम्ब फोडणार असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
यावेळी गिरिश महाजन म्हणाले की, “संजय राऊत हे नेहमी बॉम्ब आणतात पण ते फुस्के निघतात. त्यामुळे त्यांच्याजवळ बोलण्याशिवाय दुसरं काही नाही. त्यांनी मागच्या वेळी बॉम्ब तयार केला होता मात्र तो फुटला नाही. संजय राऊत फक्त आरोप करतात.. यांनी एवढे पैसे खाल्ले, त्यानं तेवढे खाल्ले पण मला प्रश्न विचारू नका. त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. तसंच आज ते काय फुसका बॉम्ब फोडतात ते पाहूया. फौज उभी करून, कार्यकर्ते उभे करून चौकशी वर परिणाम होणार नाही.”
तसंच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर अधिवेशनात आरोप केले आहेत. यावर महाजन म्हणाले, “जे सत्य आहे ते समोर येईलच. मुख्यमंत्र्यांवरचे आरोप निराधार असून कोर्टाचे निकाल देखील समोर आले आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. त्याशिवाय राज्यात शिंदे फडणवीस सरकारचं काम उत्तम सुरू असून लोकांची कामं होत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी हतबल झाली आहे”, असंही गिरीश महाजन म्हणाले.
One Comment