देश - विदेश

धनगर प्रश्न पुन्हा ऐरणीवर! पडळकरांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निर्वाणीचा इशारा; म्हणाले, “अन्यथा महाराष्ट्रात…

सांगली : (Gopichand Padalkar On Eknath Shinde) सध्या राज्यात धनगर आरक्षणावरूनही रान पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. पडळकरांनी पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठीतातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे.

आम्ही सर्व धनगर बांधव आमचे प्रश्न कायदा व संसदीय मार्गाने मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत. परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, याबाबतची काळजी व दक्षता घेऊन वरील मुद्यांबाबतची बैठक त्वरित आयोजित करावी. अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे ‘धनगर आंदोलन’ उभा राहू शकते.

धनगर आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अॅड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करावी, न्यायालयात तत्काळ व दैनंदिन सुनावणी करण्यासाठी सरकारकडून अर्ज दाखल करावा. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर ‘स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे. तसेच महसूल रेकॉर्डमधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.

आरेवाडीच्या बिरोबा मंदिर देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आणि सुशोभिकरणासाठी 200 कोटी रूपयांचा निधी द्यावा. तसेच महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने किल्ला ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा’ त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी, अशा प्रकारचे अनेक मागण्या पडळकर यांनी पत्राच्या माध्यमातून सरकराकडे केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये