पुणे : वंदे मातरम् संघटनाकृत युवा वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांच्या वतीने महाराष्ट्रातील ७० ढोल-ताशा पथकांचे अभिनव वाद्यपूजन सोहळा व डॉ. प्रभा अत्रे यांची संगीतसेवेबद्दल कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली.
ग्रंथतुलेतील पुस्तके कारगिलमधील हुंदरमन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या ग्रंथालयाला दिली जाण्याचा स्तुत्य उपक्रम रावबिण्यात येणार आहे.
“आपल्याला जी गोष्ट आवडते, ती मनापासून आणि प्रामाणिकपणाने केली, तर त्यात आपण यशस्वी होतो. कामातील स्पष्टता, सातत्य, नावीन्यता प्रगल्भतेकडे घेऊन जाते. त्यामुळे जे जे आवडते ते ते पारखून घेऊन त्यात उत्कृष्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे,” अशी भावना प्रख्यात गायिका, स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रसंगी प्रसाद भारदे यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत घेतली.
वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे
काही वर्षांपूर्वी ग्रंथालये वाचकांच्या गर्दीने फुललेली दिसायची, पण अलीकडे हे चित्र पार बदलून गेले आहे. काही ठिकाणी ग्रंथालये आहेत पण पुस्तके नाहीत, काही ठिकाणी पुस्तके आहेत, पण वाचकच फिरकत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्रंथतुलेतील पुस्तके ग्रंथालयाला हा उपक्रम जनजागृतीपर ठरणार आहे.
शास्त्रीय संगीत, त्यातील विविध राग, हरकती, बंदिशी, कायदे, घराणे याविषयी प्रभाताईंनी मनमोकळा संवाद साधला.
बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी डॉ. सतीश देसाई, दीपक मानकर, प्रसाद भडसावळे, वंदे मातरम् संघटनेचे वैभव वाघ, सचिन जामगे, ॲड. अनिश पाडेकर, अक्षय बलकवडे, शिरीष मोहिते, अमित रानडे यांच्यासह विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.