“आदित्य ठाकरे मालमत्तेचे वारसदार आहेत पण ते…”, गुलाबराव पाटलांंची टीका

मुंबई | Gulabrao Patil On Aditya Thackeray – एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तसंच आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षात फूट पडली. त्यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (20 सप्टेंबर) जळगाव दौऱ्यावर असून विरोधकांनी त्यांच्या या दौऱ्यावरून टीका केली आहे. आदित्य ठाकरे ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथेच एकनाथ शिंदे दौरा करत असल्याचं बोललं जात आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीव्ही 9 शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात एकनाथ शिंदे विरूद्ध आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), असा सामना सुरू आहे का? अशी विचारणा गुलाबराव पाटलांना केली असता त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “आदित्य ठाकरेंना फक्त ठाकरे नाव असल्यामुळेच महत्त्व आहे. एकनाथ शिंदे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. पोलिसांची काठीही त्यांनी खाल्ली आहे. तुरूंगवास भोगलेला आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
“आदित्य ठाकरेंना आमदार करण्यासाठी समोरच्या पक्षाचे दुसरे दोन आमदार करावे लागले. विधानपरिषदेच्या दोन जागा द्याव्या लागल्या. पण एकनाथ शिंदे हे ग्रासरूटचं नेतृत्व आहे. आदित्य ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत, पण ते विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. विचारांचे वारसदार आम्हीच आहोत”, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.