“अजित पवारांनी त्यांची चूक सुधारली, पण उद्धव ठाकरेंनी…”, गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल
जळगाव | Gulabrao Patil On Uddhav Thackeray – राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी त्यांची चूक सुधारली, पण उद्धव ठाकरेंनी सुधारली नाही. त्यांना ग ची बाधा नडली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राजकारणात शिवसेना (Shivsena) फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी मी 40 पैकी 33वा आमदार म्हणून शिंदे गटात सहभागी झालो होतो. पण जाताना आपण त्यांना सांगून आलो होतो. आपण भगोडे नाही. तेव्हा जे घडतं होतं त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना दिली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची चूक दुरुस्त केली होती. तसंच दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे आमदार फुटून गेले होते. त्यांनीही लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविलं होतं. आम्ही बंड केला तेव्हाही हे शक्य होतं. मात्र, उद्धव ठाकरेंची ऐकण्याची मानसिकता नव्हती. कधी कधी खूप ग खूप नडतो आणि त्याचाच हा परिणाम आहे, अशी टीका गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.