ताज्या बातम्यामुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक:काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी (Congress Star Campaigners List) जाहीर केली आहे. काँग्रेसनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस कार्यसमिती सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे यांचीही नावे या यादीत आहेत.

कर्नाटक, तेलंगणाचे मुख्यमंत्री करणार प्रचार 

काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत ४० नावांचा समावेश आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही प्रचारासाठी जाणार आहेत.

तरुण चेहऱ्यांनाही यादीत स्थान 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरीफ नसीम खान, सतेज (बंटी) पाटील, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, विलास मुत्तेमवार, भाई जगताप, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजित कदम यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. तरुण चेहऱ्यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. रणदीप सुरजेवाला, कन्हैया कुमार, इम्रान प्रतापगढ़ी, नदीम जावेद, जिग्नेश मेवाणी आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा हेही स्टार प्रचारक आहेत. हे सर्व स्टार प्रचारक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तसेच नांदेड लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये