फिचरराष्ट्रसंचार कनेक्टलेख

तिचा दादा…

तिला तो हवा होता… डोळ्यातलं आभाळ भरून आलं की पाठीवरून हात फिरवणार… कधी कधी निराशेच्या गर्दीत कोंडून घेतलेल्या जिवाच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या बोटांनी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे बोट दाखवत, पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणारा… भीतीने ग्रासलेल्या तिच्यातल्या निरागस बाळाला प्रेमाची ऊब देणारा… तिचा दादा.
किती विलक्षण असतात काही नाती, कधी कवटाळून घेतात तर कधी आपल्या प्रगतीसाठी शब्दांनी कडूदेखील बोलतात. काहीही असो शेवटी ती आपली असतात हे मात्र तितकेच खरे आहे. असेच एक प्रत्येकाच्या जीवनातील अनमोल, निःस्वार्थी, निरागस, कधी कठोर, तर कधी प्रेमळ असे प्रत्येक भाऊ-बहिणीचे अतूट नाते. आई त्याने माझी पेन्सिल घेतली इथून सुरू झालेल्या या नात्याने सत्तरी ओलांडली की काठी टेकत-टेकत पोहोचतो. आठवतात बालपणीचे दिवस… आपले बालपणीचे दिवस असे एकमेकांना म्हणत डोळ्यांच्या कडा पाणावतात.

सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत म्हणतात की, “माया कुठून इतकी बहिणीत देव जाणे आई पुन्हा समजते बहिणीत शोधल्याने…किंमत तशी न काही धाग्यास, रेशमाच्या धागा अमीर होतो राखीत माळल्याने…”

भारतातल्या प्रत्येक प्रांतात हा सण श्रावणातील नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. त्याच्या हातात राखी बांधून त्याला ओवाळले जाते. या सणाची सुरुवात केव्हा झाली, याबाबत ठोस पुरावे नाहीत. परंतु आख्यायिका सांगितल्या जातात. पूर्वीच्या काळी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. यानंतर इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा, म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव त्याला परत मिळाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती, म्हणून तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला, असे सांगितले जाते.

राखी किंवा दोरा हा फक्त शोभेच्या वस्तू नाहीत, तर राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला एकरूप करून घेतले आहे. आपल्या नात्यातील सुख-दुख, हसू-रडू, सत्य- असत्य, गुण- दुर्गुण अशा सर्व गोष्टींचा स्वीकार करून आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी त्या धाग्यामध्ये मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम, जिव्हाळा, वसल्या अमृतापरी झिरपत असते. आमची पिढी आज आभासी जगात ताई- दादा शोधताना दिसतेय, त्याऐवजी आपल्याच भावंडांशी भांडण स्वरूपातील का होईना संवाद साधा. काय सांगावे बालपणीच्या भांडणातील ते प्रेम पुन्हा तुम्हाला मिळेल.

-नीलम पवार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये