इतिहास विषय आनंदी वाटावा असा

लेखिका, सई उत्पात, सहशिक्षिका आनंदक्षण, (learning space) पुणे
दरवर्षी इतिहासाच्या पहिल्या तासाला मुले एक प्रश्न हमखास विचारतातच.
मुले : ताई, जर हे सगळे आधीच घडून गेलेले आहे, तर आता का करायचा याचा अभ्यास?
ताई : तुम्हाला तुमचे लहानपणीचे फोटो बघायला आवडतात का?
(मुलांचं स्वगत : हे का विचारते आहे ताई?)
मुले : हो ssssss !
ताई : का बरे?
मुले : अगं ताई त्यात दिसते ना, लहानपणी आपण कसे होतो, काय करायचो, कुठे गेलो होतो, तेव्हा आई-बाबा, आजी-आजोबा, बाकीचे सगळे कसे दिसत होते, तेव्हाची फॅशन कशी होती… खूप मज्जा येते.
आमच्याकडे तर खूप फोटो आहेत आणि कधीकधी सुटीत आम्ही सगळे मिळून ते फोटो बघतो. ते बघताना किती जुन्या गोष्टी कळतात…
ताई : अरे पण ते सगळं तेव्हाच घडून गेलं होतं ना?
मुले : अरेच्चा… खरंच की!
ताई : म्हणजे गोष्टी पूर्वीच घडून गेलेल्या असल्या तरी त्याबद्दल जाणून घेणं आवडतं की आपल्याला सगळ्यांनाच.
मग जसा आपल्या कुटुंबाला इतिहास आहे तसाच तो इतर कुटुंबांना, समाजाला, गावांना, देशाला आणि जगालाही आहे; तसाच तो कपडे, दागिने, अन्नपदार्थांनाही आहे आणि गणित, विज्ञान, भाषा, कला इत्यादींनाही आहे यावर चर्चा होते.
इथून पुढे ‘का ठेवलाय हा विषय अभ्यासाला?’ ही भावना थोडी बदलते.
शालेय अभ्यासक्रमात इतिहास आणि नागरिकशास्त्र हे अत्यंत दुर्लक्षित विषय झाले आहेत. पुढे (म्हणजे अर्थातच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी) याचा काही उपयोग नाही, हे सगळ्यांनी ठरवूनच टाकलं आहे. तेच मुलांच्या बोलण्यातही दिसतं. इतिहासाचा अभ्यास का करायचा ? हे पटण्यासाठी पाचवीच्या वर्गात दरवर्षी अशा स्वरूपाची चर्चा होते आणि कोणतीही गोष्ट एकदा मुलांनी स्वीकारली की नंतर मात्र ती कामं अगदी मन लावून करतात.
आता इतिहासाच्या तासाला कधी पोवाडा म्हटला जातो, तर कधी क्रमिक पुस्तकाऐवजी इतर लेखकांच्या पुस्तकातील वाचन होते. पोवाडे आणि भारुड यांची वाचनकार्ड भाषेच्या तासालाही वाचली जातात आणि भाषेत आता प्रचलित नसणाऱ्या शब्दांचे अर्थ, त्यातील भाषा सौंदर्य समजून घेतात.
गट चारच्या वर्गात क्रमिक पुस्तकाबरोबरच बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकांचाही आधार घेतला जातो. कधी मुलं स्वतःच नाटक लिहून बसवतात व सादर करतात, तर कधी कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी क्रांतिकारकांवर केलेली कीर्तने मुलांना ऐकवली जातात.
गट पाचसाठी तर अभ्यासक्रमात थोडीशी भर घालून, मुलांना रुचतील अशा चित्रांचा, फोटोंचा अंतर्भाव करून एक पूरक पुस्तक आनंदक्षणच्या काही ताईंनी मिळून लिहिलं आहे. महाविस्फोट झाला म्हणजे नक्की काय झालं असावं ? सगळे ग्रहतारे अवकाशात अधांतरी असले तरी पडत कसे नाहीत ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे छोटे छोटे प्रयोग यात आहेत. पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आवश्यक असा ऑक्सिजन कसा तयार झाला असेल ? जेव्हा माणूस बोलू आणि लिहू शकत नव्हता तेव्हा तो कसा होता आणि काय खायचा, शस्त्रे कशी तयार करायचा, याची माहिती लाखो वर्षांनंतर आपल्याला कशी मिळते? याचं स्पष्टीकरण या पुस्तकात दिलं आहे. यातली चित्रही शाळेच्या चित्रकलेच्या अमृताताईनेच काढली आहेत.
त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार वेगवेगळे उपक्रम होतात. उदाहरणार्थ एका वर्षी सातवीच्या मुलांनी शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर आधारित एका शब्दात उत्तरे देता येतील, असे प्रश्न काढून सापशिडी बनवली. आता हे साधन वापरून चौथीची मुले खेळ खेळतात, तेव्हा नकळत त्यांचा अभ्यासही होऊन जातो. ऐतिहासिक काळात वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या, राजांच्या नाममुद्रा असतात, हे कळल्यावर आमच्या सगळ्या बालव्यापाऱ्यांनी आणि बालराजांनी तर स्वतःच्या मुद्रा तयार केल्या होत्या.
इतिहासाची साधने अभ्यासल्यावर मुलांनी स्वतःच्या घरातील जुनी भांडी, नाणी, अडकित्ते इत्यादी छोट्या वस्तू आणून शाळेत प्रदर्शनही भरवले होते.
स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम म्हणजे तर इतिहास, परंपरा जाणून घेण्याची पर्वणीच. या कार्यक्रमात सगळी मुले उत्साहाने सहभागी होतात. वयोगटानुसार मुलांना समजेल असा विषय सर्वानुमते ठरवला जातो. त्यातल्या कोणत्या भागाचं सादरीकरण कोणी करायचं, कशा पद्धतीने म्हणजे Presentation, नाटिका, कविता इ. हे मोठी मुलं स्वतःच ठरवू शकतात. जरूर पडल्यास ताई मदतीला असतेच. आतापर्यंत ‘१५ ऑगस्टच्या आधी काय घडले?,’ ’संस्थानांचे विलीनीकरण,’ ‘आपल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास,’ इतिहास घडवणारे विविध वाद,’ ‘आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी व सैनिकांना दिली जाणारी विविध सन्मानपदके’ अशा अनेक विषयांवर कार्यक्रम सादर केले गेले.
या वर्षी स्वातंत्र्यदिनाला आठवी ते दहावीच्या मुलांनी ‘शस्त्रास्त्रे, सैन्यदलातील वाहने, अंतर्गत संकटांमधील सैन्याची मदत’ यावर पीपीटी सादर केली तर सातवीच्या मुलांनी ‘स्वातंत्र्य की स्वैराचार’ ही नाटिका सादर केली. भारतातील विविध राज्यांवर मुलांनी त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये शोधून कविताही रचल्या आहेत. आनंदक्षणमध्ये प्रकल्पाचे विषय अभ्यासविषयांशी जोडून घेतले जातातच. उदाहरणार्थ महाराष्ट्र प्रकल्पाच्या वेळी पॅंजिया (pangea) पासून आत्ताचा महाराष्ट्राचा भूभाग कसा तयार झाला ? त्याचबरोबर महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक इतिहास यांची माहिती मुलांना मिळवली. घर प्रकल्पात वेगवेगळ्या कालखंडात माणसाची घरं कशी बदलत गेली; ऋतुमानाबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि बदलत्या संस्कृतीचा त्यावर कसा प्रभाव हे बघितले. थोडक्यात काय या प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष व्यवहारातील अनेक गोष्टी अभ्यासक्रमाशी जोडल्या जातात. इतिहास हा विषय मुलांना, भावी पिढीला समजावा, असा विचार करून आनंदक्षणमध्ये शिकवला जातो.