पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

शिक्षकांचा सन्मान, शिष्यवृत्तीचे वाटप

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे

संस्कार, आचार, शील आणि जाणिवा जपणारे शिक्षण हेच खर्‍या अर्थाने जीवन शिक्षण होय. पण आज जीवनशिक्षण ही संकल्पनाच बाजूला पडत असून, ‘पदवी शिक्षण’ हीच संकल्पना रूढ होते आहे. त्यामुळे जगण्याची मूल्येच संपत चालली आहेत. त्यासाठीच चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

ज्ञानाने सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर ज्ञानाची निष्ठा आणि शिक्षकांची प्रतिष्ठा वाढायला हवी, असे आग्रही मतदेखील त्यांनी नोंदविले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे ब्राह्मण मंगल कार्यालय येथे शिक्षक पुरस्कार, बक्षीस वितरण आणि सर्व समाजातील ५० होतकरू विद्यार्थ्यांना सुमारे दोन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. देखणे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती कृष्णकुमार गोयल होते. संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव, केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, शैक्षणिक विभागप्रमुख राजेंद्र देवधर व्यासपीठावर होते. मराठी भाषेसाठी योगदान देणार्‍या शिक्षकांचा कै. सुमन बेलवलकर यांच्या स्मरणार्थ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर संस्कृत आणि भाषेसाठी योगदान देणार्‍या शिक्षकांचा सन्मान सुमेधा सरदेसाई यांच्या सहकार्याने करण्यात आला.

पुरस्कारार्थी : मृणालिनी कानिटकर-जोशी (सेवासदन शाळा), स्वाती कुलकर्णी (महाराष्ट्र मंडळ शाळा, टिळक रोड), अमृता अराणके (भावे शाळा), वेदमूर्ती मंदार शहरकर (वेद पाठशाळा), डॉ. विकास बहुले, डॉ. चंद्रशेखर भारती, रेखा कोळकर, शिवानी दोशी, स्वरूप बरिदे, विवेक पाठारे, डॉ. अपूर्वा पोरे, डॉ. समीर कुलकर्णी, चैत्राली जोशी, सिमंतिनी जोशी, अमृता पैठणकर.

डॉ. देखणे पुढे म्हणाले, भारताला ज्ञानदानाची पाच हजार वर्षांची परंपरा आहे. जगात ज्ञानाइतके पवित्र, शुद्ध आणि तेजस्वी आणि उत्तुंग असे दुसरे काही नाही. शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचा आविष्कार होय तर शिक्षक हेच ज्ञानाचे प्रबोधक आणि उपासकही आहेत. विश्वव्यापी ज्ञानाचे मूर्त रूप म्हणणे शिक्षक. म्हणून शिक्षण हाच प्रभावी ज्ञानसंवाद होय. बुद्धीला ज्ञान असे म्हटले जाते. ज्ञानतत्त्वाला लोकमानसात रुजविणारे ज्ञानतत्त्वाचे बोधरूप म्हणजे शिक्षक होत. अज्ञानाच्या अंधाराला कोंडत कोंडत विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाच्या उजेडाला जो मांडत असतो तोच खरा शिक्षक होय.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, गुणवंत समाजबांधवांना शोधून त्यांना पुरस्कार देणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. पुरस्कार मिळाला म्हणजे काम संपत नाही तर पुरस्कारामधून प्रेरणा घेऊन पुढे जोमाने काम करणे अपेक्षित असते. ध्येयाने पुढे जा, मोठी स्वप्ने बघा आणि यश संपादन करा, अशा शुभेच्छा त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये