गुप्तधनासाठी बुलढाण्यात १४ वर्षीय मुलाचा नरबळी

आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्या आजूबाजूला अंधश्रद्धेच्या घटना घडतांना दिसत आहेत. गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी द्यायलाही लोक आजही मागे-पुढे पाहत नाहीत. बुलढाण्यात पैसे मिळवण्याच्या उद्देशाने नरबळीचा प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या १४ वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. कृष्णा घटनेच्या दिवशी सकाळी नागझरी येथील रुपेश वारोकार या तरुणाच्या मोटार सायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी रुपेशची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेवटी आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली दिली आहे.
आरोपीने हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याला जंगलात कृष्णाचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. चौकशीअंती रुपेश वारोकार यानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबीयांनी कृष्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. मात्र दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मशानात लिंबू, हात-पाय तोडलेली बाहुली, धागे-दोरे, दारूची बाटली आणि पुजेचे साहित्य दिसून आले.
कृष्णाच्या अत्यंविधीच्या ठिकाणी पुजेचं साहित्य आढळून आल्याने ही हत्या अघोरी पुजेसाठी केल्याचं उघडकीस आलं आहे. नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे सर्व कोणी केलं याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्याची मागणी जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ.संजय कुटे व आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. तर उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीआरोपीची नार्को टेस्ट करून सत्य कारण समोर आणण्याची मागणी केली आहे.