‘…राज्याची करदाता असल्याने मला हे जाणून घ्यायचं आहे’; साक्षी धोनीचं ट्विट चर्चेत

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं केलेलं ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. साक्षीने झारखंडमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. साक्षी धोनी सध्या झारखंडमधील वीज खंडित झाल्यामुळे हैराण आहे. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत तिने प्रश्न उपस्थित करत सरकारवर सडकून टीका केली आहे. तसंच साक्षी धोनीने सोमवारी ट्विटरवर रांचीमध्ये होत असलेल्या विजेच्या लपंडावाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
साक्षीने ट्विट करून विचारले आहे की, झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेची समस्या का आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. राज्याची करदाता असल्याने मला हे जाणून घ्यायचे आहे. आयपीएल सामन्यांमुळे धोनी महाराष्ट्रात आहे, तर साक्षी कुटुंबासह रांचीमध्ये आहे. तसंच रांचीसह संपूर्ण राज्यात विजेचा तुटवडा आहे.
“झारखंडची करदाती म्हणून मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? आम्ही ऊर्जा वाचवत आहोत याची खात्री करून जबाबदारीने आमची भूमिका बजावत आहोत!,” असं साक्षी धोनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वीजपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर साक्षीच्या चाहत्यांनी देखील यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.