ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला तर…’- अजित पवार

सांगली : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरून राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी “महाराष्ट्रात योगी नसून फक्त सत्तेचे भोगी आहेत” अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका देखील केली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत झालेल्या सभेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे. घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दिवाळीचे असे १५ दिवस काढले आहेत. यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”.

मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल. “शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते. उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे तर रात्री वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात. काही ठिकाणी प्रवचन, कीर्तन असतं. हरिनाम सप्ताह असतो. हे सगळं रात्रीच आपल्या गावांमध्ये असतं. लाऊडस्पीकर चालू असतो. आपण कधी कुणाला बोलत नाही. काही ठिकाणी वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम चालू असतात”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

“आरे बाबांनो, तुम्ही नियम लावायला जर गेलात तिथे उत्तर प्रदेशमध्ये जो निर्णय झालाय, त्यानुसार आम्हाला माहिती मिळाली आहे की मथुरेमध्ये पहाटेचा लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय?”, असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये