‘किरीट सोमय्या जास्त बोलले तर त्यांच्या तोंडात मी…’- संजय राऊत

मुंबई : शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली आहे. यासंर्दभात आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “आयएनएस विक्रांत घोटाळ्यामुळे लोकांच्या मनात चिड निर्माण झाली आहे. आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दोन दगड मारले तर भाजपाला याचे दुःख होण्याची गरज नाही. अशा गुन्हेगारांच्या बाबतीत भाजपाचेही हेच मत आहे. जे देशद्रोही आहेत त्यांना लोक माफ करणार नाहीत. तरीही पोलिसांनी योग्यरित्या परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. पण महाराष्ट्राची जनता अशा गुन्हेगारांना माफ करणार नाही.”
“हे आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. आयएनएस विक्रांतच्या नावावर यांनी लोकांकडून कोटी रुपये गोळा केले आणि ते राजभवनावर जमा केले नाही. हा देशद्रोह आहे. असा खोटारडा माणूस खार पोलीस ठाण्यात दुसऱ्या आरोपीला भेटायला गेला होता. आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी ज्या पद्धतीने तिथे वावरत होते त्यामुळे लोकांच्या मनात संताप निर्माण झाला असेल. त्यातून हल्ला झाला असेल. देशद्रोही आरोपींवर असे दगड पडतात. भाजपाने अशा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, “आयएनएस घोटाळ्यातील आरोपीचे युवक प्रतिष्ठान आहे. त्याची सर्व खाती तपासली पाहिजेत. ईडीचे कारवाई झालेले लोक युवक प्रतिष्ठानचे देणगीदार आहेत. किरीट सोमय्यांनी ईडीच्या कारवाईने धमकावून यांच्याकडून पैसे घेतले आहेत. किरीट सोमय्या जास्त बोलले तर त्यांच्या तोंडात मी कागदपत्रे टाकेन.”
“केंद्र सरकार ज्यांना सुरक्षा पुरवत आहे तो तर या देशाचा सर्वात मोठा सुरक्षा घोटाळा आहे. केंद्र सरकारचा संपूर्ण देशात सुरक्षा घोटाळा सुरु आहे. जी व्यक्ती आमच्या विरोधात बोलते त्यांना लगेचच सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. हा मोठा घोटाळा आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.