‘…सोमय्या गुन्हेगार नसतील तर त्यांनी समोर यावं’; अनिल परब

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसंच सोमय्या गायब देखील आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी, सोमय्या जर गुन्हेगार नसतील तर त्यांनी समोर यावं असं आवाहन केलं आहे. अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एसटी सेवा सुरळीत करण्याबाबत बैठक पार पडली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अनिल परब म्हणाले, “सोमय्यांनी पैसे तर गोळा केले आहेत पण हे पैसे राजभवनात पोहोचलेले नाहीत असं पत्र खुद्द राजभवन कार्यालयानं दिलं आहे. त्यामुळं याची चौकशी तर होणारचं. सोमय्या दुसऱ्यांना सांगतात जर गुन्हा केला नसेल तर तपास यंत्रणांच्या चौकशीला का घाबरता? मग आता जर ते गुन्हेगार नसतील तर त्यांनी समोर यावं. सोमय्यांविरोधातील गुन्ह्याचं एकंदर स्वरुप बघुन पोलीस याबाबत निर्णय घेतील.”