“हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत”
मुंबई : आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा झाला. सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे त्याच ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार शब्दात विरोधकांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. ज्यांनी ५६ वर्षापूर्वी मुंबईत एक ठिणगी टाकली होती. यामधून जगभरात वणवा पेटला होता त्याच वणव्याचा आज वर्धापण दिन आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे म्हणायचे या देशाला बाप नाही परंतु आज मी सांगू इच्छितो की, ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापच मानतो. आणि बाप हा एकच असतो असं राऊत म्हणाले. त्याचबरोबर नुकताच आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा देखील झाला. यामुळे कोणीही हिंदुत्व काय असत, ते असं असावं हे सांगायची गरज नाही असं देखील राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली असली तरी एक-दोनजागांनी त्यामध्ये जिंकून आला म्हणजे तुम्ही सगळं जग जिंकल असं नाही. आता तर शिवसेनेला ५६ वर्ष पूर्ण झाली आहेत, अजून प्रवास भरपूर करायचा आहे हे आधी विरोधकांनी समजून घ्यावं. आजही राज्याची सूत्र शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरेंकडे आहेत हे लक्षात घ्यावं. काही लोकांना जास्त घमंड आला आहे त्यांनी जास्त घमंड करू नका अशा शब्दात निशाणा साधला.