“जर आमचं आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला तर…”, इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
छत्रपती संभाजीनगर | Imtiyaz Jaleel On Devendra Fadnavis – गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसंच इम्तियाज जलील यांच्याकडून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्यामुळे जलील यांच्याकडून सुरु असलेलं आंदोलन त्यांनी मागं घ्यावं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. यावर आता जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जर आमचं आंदोलन जबरदस्तीनं बंद करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्यात येईल,” असा इशारा जलील यांनी दिला आहे.
उपोषणास्थळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस म्हणाले की आंदोलन मागे घ्यावं. पण मी त्यांना सांगतो आंदोलन मागे घेणार नाही. तुम्ही सांगितलं म्हणून सर्व काही होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही गृहमंत्री आहात. पण तुमच्यासारखे किती आलेत आणि किती गेलेत. आमचं आंदोलन जबरदस्तीनं बंद करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. हा माझा सरकार आणि प्रशासनाला इशारा आहे.”
“कँडल मार्च काढल्यानं माझ्यासह दीड हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्यावर असे गुन्हे दाखल केल्याने आम्ही घाबरणार नाही. या गुन्ह्यात 29 लोकांची नावं असून, दीड हजार अज्ञात लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण कँडल मार्च काढणारे आम्ही कोणी अज्ञात नसून, आमची ओळख सांगण्यासाठी आणि नावं देण्यासाठी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात पाच हजार लोकांना घेऊन आम्ही धडकणार आहोत”, असंही जलील म्हणाले.