तिनं मेकअप केला अन् लग्नच मोडलं, नंतर झालं असं काही की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…
बंगळूर | Makeup Side Effects – प्रत्येक नवरा-नवरीला आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. त्यासाठी ते लाखोंचा खर्च करायला तयार असतात. त्यात आजकाल ब्युटी पार्लरवाले (Beauty Parlour) मेकअप (Makeup) करण्यासाठी हजारो रूपये घेतात. तसंच नवरीच्या देखील मेकअपच्या बाबतीत खास अपेक्षा असतात. मात्र, एका नवरीला तिच्या मेकअप करण्याबाबतच्या अपेक्षा चांगल्याच महागात पडल्या आहेत. या तरूणीला लग्नासाठी मेकअप करणं महागात पडलं असून त्यानंतर तिचं लग्नच मोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
IANS च्या रिपोर्टनुसार, कर्नाटकातील एका तरुणी लग्नासाठी मेकअप करायला गेली होती. मात्र, मेकअप केल्यानंतर या तरूणीला थेट रुग्णालय गाठावं लागलं आहे. मेकअप केल्यानंतर तिचा चेहरा इतका बिघडला की तिला डायरेक्ट अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावं लागलं. एवढंच नाही तर यामुळे तिचं लग्नही मोडलं आहे. या प्रकरणानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्नाटकातील ही घटना शुक्रवारी (3 मार्च) उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही जाजूर गावची रहिवासी आहे. 10 दिवसांपूर्वी या पीडितेनं शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप ट्रीटमेंट करुन घेतली होती. मेकअप केल्यानंतर पीडित तरूणीचा चेहरा काळा पडला आणि तिच्या चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर तिचा चेहरा इतका सुजला की तिला रुग्णालयात थेट ICU मध्ये दाखल करावं लागलं.
पीडित तरूणीच्या ब्युटीशियन गंगा यांनी तिला सांगितलं होतं की, त्यांनी तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स लावले होते. पण मेकअप ट्रीटमेंट केल्यानंतर पीडितेला त्याची अॅलर्जी झाली आणि तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे लग्न पुढे ढकलण्यात आलं. तसंच याप्रकरणी अर्सिकेरे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपी ब्युटीशियनलाही पोलिसांनी समन्स पाठवलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर वर पक्षानं हे लग्न मोडलं आहे. पीडितेला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी नवीन करुन बघायचं होतं. म्हणून ती ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. ब्युटीशियननं तिच्या चेहऱ्यावर आधी फाऊंडेशन लावलं. त्यानंतर तिनं स्टीमही घेतली. त्यामुळे नवरीच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन झाली. तसंच आता तिची प्रकृती फार खराब झाल्यानं तिला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे.