चिंताजनक! ऊसतोड महिलेचं खड्डेमय रस्त्यातच जन्मलं बाळ, नाईलाजाने खुरप्यानं तोडावी लागली नाळ

कोल्हापूर | Kolhapur News – खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एका ऊसतोड गर्भवती महिलेची (Sugarcane Worker Delivery) प्रसुती खड्डेमय रस्त्यातच झाल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात घडली आहे. सुदैवानं आईची आणि बाळाती तब्येत बरी असून ते सुखरुप आहेत.
निपाणी-मुरगूड (Nipani-Murgud Road) रोडवरील यमगे गावामध्ये हा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातून ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील ही मजूर महिला होती. तिला प्रवासादरम्यान खराब रस्त्यामुळे प्रसुती कळा सुरु झाल्या आणि रस्त्यातच तिनं बाळाला जन्म दिला. यानंतर त्या महिलेला आणि तिच्या बाळाला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रयत साखर कारखान्याकडे 32 मजूर ऊस तोडणीचं काम करत आहेत. सध्या ते कासेगावात वास्तव्यास आहेत. तसंच ते सायंकाळी तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेनं निघाले होते. त्यावेळी शुक्रवारी (3 मार्च) नऊच्या सुमारास यमगेजवळ आल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. खड्डेमय रस्त्यामुळे तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. या महिलेला त्रास होत असल्याचं समजताच ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी तातडीनं 108 रुग्णवाहिकेस कॉल केला. मात्र, रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याकडेलाच शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला. आणि किरण केसू पालवी (रा.खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) या महिलेनं आपल्या बाळाला जन्म दिला. धक्कादायक म्हणजे सुविधा नसल्यानं आडोसा केलेल्या महिलांनी बाळाची नाळ खुरप्यानं कापली होती.
यानंतर, यमगे गावातील आशा स्वयंसेविकांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णालयाकडे पाठवण्याचं सोपस्कार केलं. सध्या त्या दोघांवर अधिक उपचार सुरु असून बाळ आणि आई सुरक्षित आहेत.