आरोग्यपुणे

कर्करोगावरील रेडिओथेरपी मशीनचे लोकार्पण

रोटरीतर्फे आठ कोटींचे अनुदान

पुणे : रोटरी इंटरनॅशनलच्या पहिल्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे संघटनेत विविध दृष्टिकोन असणार्‍या सदस्यांसाठी संवादाचे माध्यम खुले झाले आहे. उच्चपदावर महिलांच्या निवडीबाबत असलेला रूढीवाद मोडीत काढत, तरुण पिढीसाठी एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे मत रोटरी इंटरनॅशनलच्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर जोन्स यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

रोटरी इंटरनॅशनलच्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिलेची अध्यक्षपदी निवड झाली असून, कॅनडा येथील ओंटारियोमधील रोटरी क्लब ऑफ विंडसर रोझलँडच्या सदस्य असलेल्या जोन्स यांना हा बहुमान मिळाला आहे. सध्या भारत दौर्‍यावर असलेल्या जोन्स यांनी शुक्रवारी पुण्यात भारतातील रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेतली.

रेडिओ थेरपी मशीन

आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील नागरिकांना कर्करोगावरील रेडिओ थेरपी उपचार घेता यावेत, यासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१’तर्फे शनिवारवाडाजवळील सूर्या रुग्णालयात ‘लिनिअर एक्सलेटर रेडिओथेरपी मशीन’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी रोटरीतर्फे ८ कोटी रुपये तर रुग्णालयाने ४ कोटी रुपये योगदान दिले आहे. या माध्यमातून प्रतिमहिना १२०० रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. या उपचारासाठी सामान्यपणे तब्बल एक ते दीड लाख रुपये खर्च येतो, मात्र सूर्यदत्ता हॉस्पिटल येथे पिवळा आणि केशरी रेशनकार्ड धारकांना हा उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे.

याप्रसंगी सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे डब्लू मेरिएट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. या परिषदेसाठी रोटरी इंटरनॅशनलचे संचालक ए. एस. व्यंकटेश आणि डॉ. महेश कोटबागी, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या पब्लिक इमेज को- डिरेक्टर संगीता लालवाणी उपस्थित होते. रोटरी इंटरनॅशनलतर्फे जगभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, बालकल्याण अशा सात विविध क्षेत्रांत काही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत.

रोटरी क्लब इंडिया’ने गेल्या काही वर्षांत अतिशय चांगली कामगिरी केली आहे. ‘मदत घेणारे ते मदत करणारे’ असा अद्भुत प्रवास करीत, रोटरी इंडियाने अतिशय चांगल्याप्रकारे स्वत:चा विकास केला असून, प्रत्येक प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी असणारा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. या भेटीत मला त्यांच्या या प्रवासाबाबत जाणून घेता आले.

_जेनिफर जोन्स, पहिल्या महिला अध्यक्ष

भारताचा विचार करता, या ठिकाणी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध प्रकल्प राबविले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात रोटरी क्लब आणि रुग्णालय यांच्यामध्ये सात वर्षांचा करार करण्यात आला आहे. शुक्रवारी, दिनांक २२ जुलै रोजी रोटरी इंटरनॅशनलच्या पहिल्या महिला अध्यक्ष जेनिफर जोन्स यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये