क्रीडाराष्ट्रसंचार कनेक्ट

भारत-आॅस्ट्रेलिया लढत आज

टी-२० मालिका : सामन्यांदरम्यान बदलता येणार खेळाडू

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी रोहित अ‍ॅण्ड कंपनीची परीक्षा कांगारुंंविरुद्ध उद्यापासून (मंगळवार) मोहालीत सुरू होत असलेल्या टी-२० सामन्याने होत आहे. भारत आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. चंदीगडमधील मोहाली येथील पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर पहिली लढत होणार आहे.

विश्वचषकापूर्वी भारत त्यांचे योग्य संयोजन, विशेषत: मधल्या फळीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे आॅस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसह काही प्रमुख खेळाडूंशिवाय भारतात आला आहे. वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे, तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस आणि मिचेल मार्श यांना दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला कर्णधार अ‍ॅरॉन फिंचवर सर्वांचे लक्ष असेल. विश्वचषकापूर्वी तो फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टीम डेव्हिडवरही सर्वांच्या नजरा असतील. रोहितला विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करण्याबाबत विचारले असता कर्णधाराने स्पष्टपणे सांगितले, की विराट बॅकअप सलामीवीर आहे, पण केएल राहुल त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल. आशिया चषक २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात विराट आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली आणि विराटने जवळपास तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजता

ग्लेन मॅक्सवेलने भारतीय चाहत्यांची मने जिंकली

आॅस्ट्रेलियाचा भरवशाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे भारतात चाहते काही कमी नाहीत. आॅस्ट्रेलियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्यापूर्वीच असे काही केले, की सर्वांचे मन जिंकले. मॅक्सवेलने सरावसत्रात युवा क्रिकेटपटूंसोबत काही वेळ घालवला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले आणि त्यांच्या चेंडूंचा सामनाही केला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

आॅस्ट्रेलिया संघ : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन अ‍ॅबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, नॅथन एलिस.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये