कांगारूंचे टीम इंडियासमोर 277 धावांचे आव्हान, शमीच्या भेदक माऱ्यापुढे निम्मा संघ गारद..

India Vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीत खेळल्या जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चार धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाची पहिली विकेट पडली. मिचेल मार्श चार चेंडूत चार धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला आऊट केले. ऑस्ट्रेलियाला मार्शच्या रूपाने पहिला धक्का बसल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरत 12 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला अर्धशतक पार करून दिले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या धक्क्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने सावध सुरूवात केली. मात्र सेट झाल्यानंतर वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करत 50 चेंडूत 51 नाबाद 51 धावा ठोकल्या. स्मिथनेही आपला गिअर बदलला. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. मात्र रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकणाऱ्या वॉर्नरला आणि त्यानंतर मोहम्मद शमीने स्टीव्ह स्मिथला बाद करत ही जोडी फोडली.
परंतु मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरत ऑस्ट्रेलियाला 31 षटकात 150 धावांच्या पार पोहचवले. मोहम्मद शमी आणि भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 186 धावात गारद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि जॉश इंग्लिस यांनी भागीदारी रचत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला.
ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील आणि तळातील फलंदाजांनी झुंजापणा दाखवत भारताविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सर्वबाद 276 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 9 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. तर जॉश इंग्लिसने 44 धावा तर स्टॉयनिसने 29 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या.