भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनचं बाॅलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मुंबई | Shikhar Dhawan – भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शिखर धवन हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्यासोबत “डबल एक्सएल” (Double XL) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याचा हुमा कुरेशीसोबतचा एक रोमँटिक फोटो समोर आला आहे.
शिखर धवननं एका मुलाखतीदरम्यान त्याच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगितलं. शिखर म्हणाला, ”मी एक खेळाडू म्हणून देशासाठी खेळत आलो आहे. यामुळे जीवन नेहमीच व्यस्त असते. माझा आवडता टाइमपास म्हणजे चांगले चित्रपट पाहणं. मला या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा कथा ऐकून घेतली. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. या चित्रपटातून संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे. मला आशा आहे की, अनेक तरूण त्यांच्या स्वप्नांची उड्डाणे घेतील.”
दरम्यान, ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सतराम रमानी यांनी केलं आहे. तसंच या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमा व्यतिरिक्त झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.