राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

लिख लेने दो अपनी किस्मत!

इराणची ढासळती अर्थव्यवस्था….

उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभ्यासक

इराणमध्ये अलीकडे हिजाब जाळले गेले. इंटरनेट बंद राहिलं. कर्फ्यू लावण्यात आला. अनेक इराणी महिला आपले केस कापतानाचे आणि हिजाब जाळतानाचे व्हिडीओ मोठ्या हिकमतीने सोशल मीडियावर झळकवत आहेत. त्या सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्याला कारणीभूत ठरला अमिनी नावाच्या २२ वर्षीय इराणी महिलेचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू. त्यामुळे अख्खं इराण ढवळून निघालं.

खरं तर इराण आधीपासूनच धगधगत होतं. बेरोजगारी, वाढती महागाई, पाण्याचं दुर्भिक्ष्य, महिलांची मुस्कटदाबी, ढासळलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा स्फोट कधी ना कधी तरी होणारच होता. त्यात भर पडली अमेरिकेच्या कडक आर्थिक निर्बंधांची. या निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन अधिक कठीण बनलं, अर्थव्यवस्था थंडावली, आयात-निर्यात रोडावली. उत्पादन क्षेत्र थबकलं. रोजच्या गरजेची औषधं मिळेनाशी झाली. या सगळ्यामुळे जनतेचा असंतोष उफाळून येणार हे धूर्त अमेरिकेने ओळखूनच हे निर्बंध लावले होते. निदर्शनं तीव्र बनली. अन् सरकार अडचणीत आलं. तेच अमेरिकेला हवं होतं. या सगळ्याचा उत्कलन बिंदू ठरला म्हासा अमिनी या तरुणीचा मृत्यू. त्यामुळे ठिणगी पेटली आणि तेलसमृद्ध इराण आज ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. अर्थात सरकार हा सगळा उठाव मोडून काढण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व अस्त्रांचा नैतिक-अनैतिक वापर करत आहे. इराणचं शासन मुळातच अतिकर्मठ. त्याच्याकडून प्रत्युत्तरादाखल मानवी अधिकार उल्लंघनाचे इतर देशांचे दाखले प्रसृत केले जात आहेत.

१९७९ पर्यंत इराण मुक्त होतं, स्वतंत्र होतं. महिला खुलेपणाने फिरत होत्या. व्यवसाय, उद्योग करत होत्या. हवे ते कपडे, हवा तसा शृंगार करत होत्या. पुरुषांच्या बरोबरीने जीवनाचा उपभोग घेत होत्या. पुढे अयातुल्ला खोमेनींची धार्मिक राजवट आली. कर्मठ धर्माच्या रासवट पंजाखाली स्वातंत्र्य गुदमरून गेलं. महिलांवर कडक निर्बंध आले. डोक्यापासून पायापर्यंत नखही दिसणार नाही अशा हिजाबचा पेहराव सक्तीचा झाला. कोणीही महिला घरातून बाहेर पडताना अत्तर लावते का, कोणाबरोबर जाते, शरीरावर टॅटू आहे का, अशा अनेक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गस्ते ईर्शाद चौकाचौकात फिरू लागले. अन्‌ महिला घरामध्ये कोंडल्या गेल्या. साधं सूर्यदर्शनही दुर्मिळ झालं. खरं तर पूर्वीचं इराण खूप स्टायलिश होतं. पण नवी सत्ता स्थापन झाली आणि सारं काही बदललं. या परिस्थितीतूनही मार्ग काढत स्त्रिया जगत होत्या, आपलं आभाळ शोधत होत्या. पण सगळेच दरवाजे आणि कवाडं मध्ययुगीन धर्माच्या पोलादी राजवटीत बंद झाली. स्वप्नांचा चुराडा होत निव्वळ दुर्दैवाचं अस्तित्व भाळी आलं. मरणानं सुटका केली, जगण्यानं छळलं होते, अशीच अवस्था.

म्हासा अमिनीचा गुन्हा काय तर हिजाब घातला नाही. या कारणास्तव नैतिक रखवालदार पोलिसांनी अटक केली आणि एका क्रूर अमानुष अत्याचाराला सुरुवात झाली. त्या अमानुषतेचे काही व्हिडीओ माध्यमांकडे चोरून पाठवले गेले. तेहरान या राजधानीच्या शहरात एक आठवड्यापूर्वी तोच ड्रेस घालून म्हासा अमिनी रस्त्यावरून फिरली तेव्हा तिला कोणी हटकलं नाही. पण देशांतर्गत कर्मठ भागात गेल्यावर मात्र ती धार्मिक सैतानांच्या तावडीत सापडली. ही घटना १३ सप्टेंबरची. पुढे ॲम्ब्युलन्स, तिचं इस्पितळात अत्यवस्थ अवस्थेत भरती होणं, कोमामध्ये मृत्युमुखी पडणं हे सगळं अवघ्या चार दिवसांमध्ये घडलं. तिचा मृत्यू हृदयविकाराने झाला, असं सरकारनं प्रसृत केलं. अर्थात २२ वर्षांच्या मुलीचा असा मृत्यू झाला, यावर शेंबड पोरदेखील विश्‍वास ठेवणार नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृत्यू अतिमारहाणीमुळे झाला, हे ठासून सांगितलं. सवाल आहे तिच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? अन्‌ हे गूढ वाढत गेलं. ठिणगीचं रूपांतर आगीत आणि आगीचं लोण तब्बल ८० शहरांमध्ये पसरलं. खरा प्रश्‍न स्वातंत्र्याचा, किंबहुना महिला स्वातंत्र्याचा आहे. आज इराणी महिला रस्त्यावर येऊन निदर्शनं करताना, हिजाब जाळताना स्वातंत्र्याच्याच घोषणा देत आहेत. सरकार त्यांच्यावर चवताळून हल्ले करतंय. अनेक महिला मृत्युमुखी पडल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सर्वत्र हिंसाचार, रक्तपात आणि मुस्कटदाबी हेच धर्मांध इराणचं आजचं भीषण वास्तव आहे. इराण हा शियाबहुल देश आहे. मग इतर शिया देशांतही अशीच अवस्था आहे, असं म्हणायचं का?
(पूर्वार्ध)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये