Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

‘आधी कुलकर्णी, आता टिळक…’; भाजपकडून अन्याय का?

पुणे : (Kasba Byelection) भाजपचे होम पीच असलेल्या नागपूरमध्ये भाजपच्या विधान परिषद निवडणुकीतील उमेदवाराचा पराभव झाला. हा उमेदवार पक्षातील द्वंद्वामुळेच पडला असल्याचे जगजाहीर आहे; परंतु यातूनही भाजप काही धडा घ्यायला तयार नाही. पुण्यातदेखील आधी मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यावर अन्याय केल्याची भावना तीव्र असताना पुन्हा एकदा कसबा पोटनिवडणुकीमध्ये टिळक (Mukta Tilak) घराण्याला उमेदवारी नाकारून रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. (स्व.) मुक्ता टिळक यांनी कर्करोगाशी सामना करत असतानादेखील भाजपला साथ दिली. विधान परिषदेच्या मतदानासाठी जिवावर उदार होऊन त्या मुंबईला गेल्या. परंतु त्याचीही चाड नेत्यांना राहिली नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु तेथे असलेल्या बहुतांश ब्राह्मण समाजाच्या मतदानाला देखील भाजपने फारसे मूल्य दिलेले दिसत नाही. यापूर्वी कोथरूडमध्ये देखील असाच अनुभव आला होता. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे पुनर्वसन करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट असलेल्या समाजाच्या मेधा कुलकर्णी यांना अलगदपणे बाजूला ठेवले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर अन्याय केला. कुठलेही सन्मानाचे पद दिले नाही. अनेक संधी आल्या; परंतु त्यांचे पुनर्वसन केले नाही.

गिरीश बापट यांनाही काही वर्षांपासून थोडेसे बाजूला ठेवण्यात आले आहे. यातून पक्षांमध्ये एका वेगळ्या पद्धतीचे वारे वाहत असल्याचे दिसून आले.

आता देखील पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर नैसर्गिक न्यायाने टिळक यांच्या घराण्याला उमेदवारी देण्याची गरज होती. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत असताना कसब्यात देखील तोच न्याय होईल असे वाटत होते. परंतु अनेकदा सत्तेची संधी आणि अनेक पदे दिलेल्या रासने यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली. या मागे ‘अर्थकरणा’ची चर्चा असल्याचा सूर ऐकू येत आहे. त्या संपूर्ण प्रकरणामुळे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये