ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की मुख्यमंत्री…’- पृथ्वीराज चव्हाण

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपासह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनांचा निषेध नोंदवला जात नाही. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याला मुकसंमती आहे, असा आरोप केला आहे. ते रविवारी पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “भाजपाच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. संयम किती पाळायचा याला मर्यादा आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून निषेध नोंदवला जात नाही. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याला मुकसंमती आहे. त्यांच्याकडून जो सिग्नल येतो त्याप्रमाणे म्हैसूर असेल किंवा नवनवीन प्रकरणं काढली जातात. सगळ्या राज्यांमध्ये धार्मिक तेढ आणि द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जातं. हिंसा घडवायचा प्रयत्नही होत आहे. हे भाजपाचं पद्धतशीर कारस्थान आहे.

“राष्ट्रपती राजवट लावताना घटना नियम आहेत. हे राज्यपाल काहीही लिहू शकतील. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की मुख्यमंत्री आहेत हे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात जे घडत आहे ते दोन्ही बाजूंनी घडतंय. राज्याचं नाही देशासाठी हे हानिकारक आहे. जातीयवादी राजकारणामुळे देशात गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. एखादी निवडणूक जिंकण्यासाठी देशाचं नुकसान केलं जात आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

पुढ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मला राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दल काहीच चिंता नाही. भाजपाचं कमळ ऑपरेशन इथे महाराष्ट्रात उपयोगी ठरणार नाही. त्यांच्याकडून आणखी काही घटनात्मक पद्धतीने काही होईल का हा प्रयत्न सुरू आहे.”

“देशात सध्या धार्मिक द्वेषाचं राजकारण सुरू आहे. अचानक काही लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत. राजकीय लढाई ही घटनात्मक मार्गाने लढली पाहिजे. देशात सध्या असहिष्णुतेचं वातावरण कोण निर्माण करत आहे? धार्मिक द्वेषाच्या राजकारणाचा निषेध केला पाहिजे. या गोष्टीला कोणाचा मुक पाठिंबा आहे का?”, असंही ते म्हणाले.

“कुणाच्याही गाडीवर हल्ला होणं चुकीचे आहे. राणा दाम्पत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करतील. देवेंद्र फडणवीस यांना अखंड भारताचा कार्यक्रम राबवू द्या. फक्त आम्हाला फडणवीसांनी अखंड भारताची रूपरेषा सांगितली, तर आमच्या बुद्धीत देखील भर पडेल. १३५ वर्षात काँग्रेसने घेतलेली भूमिका आता बदलणे शक्य नाही,” असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये