ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

हे नामांतर फक्त शहराचं की जिल्ह्याचं? दानवेंच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “आधी तुम्ही…”

मुंबई | Devendra Fadnavis – नुकतंच केंद्र सरकारनं औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हे नामांतर फक्त औरंगाबाद शहराचं आहे की संपूर्ण जिल्ह्याचं असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता फडणवीसांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर अंबादास दानवेंनी त्या निर्णयाचा फोटो शेअर करत एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचं आहे की संपूर्ण जिल्ह्याचं, यावर केंद्रानं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. औरंगजेबाचं नाव मिटवायचं असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’, असं यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगा देवेंद्रजी!”

यावर देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवेंचं ट्विट रिट्विट करत त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असं नामकरण झालं आहे.”

“त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये