राष्ट्रसंचार कनेक्ट

चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याची प्रथा

शेकडो वर्षांपासून असलेले ‘सुखेड-बोरी’ गावातील वेगळेपण

खंडाळा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वेगळेपण जपणारा उत्सव म्हणून ‘बोरीचा बार’ ओळखला जातो. सुखेड-बोरी या दोन गावांच्या महिला गावाच्या हद्दीतील ओढ्यावर येऊन एकमेकींवर शिव्यांची लाखोली वाहतात, ही परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जात आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर यंदा हा सोहळा उत्साहात पार पडला. महत्त्वाचे म्हणजे ‘बोरीचा बार’ समाजमाध्यमातून बहुतांश कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा आहे. दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुखेड-बोरी या दोन गावांमधील ओढ्यालगत ‘बोरीचा बार’ रंगविला जातो. त्या ठिकाणी एकमेकांना शिव्या दिल्या जातात. डफ, हलगी आणि कर्णे वाजवण्याच्या नादात ही संगत असते. या घोषणाबाजीने दोन्ही बाजूच्या महिलांमध्ये उत्साह असतो.

या दोन्ही गावांतील शेकडो महिला गावाच्या वेशीवर असलेल्या सीमा ओढ्यावर ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी व सततच्या पावसात बोरीचा बार परिधान करण्यासाठी येतात. शिव्यांची लाखोली वर्षातून एकदा उत्साहाने पार पाडली जाते. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील एका महिलेला ओढून नेले जाते. या महिलेला गावात नेऊन साडी दिली जाते आणि ओटी दिली जाते. जगावेगळा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातून हजारो लोक येतात. यंदा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. ‘बोरीचा बार’ हा आगळावेगळा पारंपरिक उत्सव म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो.

दरवर्षी मोठ्या उत्साहात ही परंपरा जोपासली जाते. यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. तसेच, सांस्कृतिक परंपरेतील या वेगळ्या उत्सवामुळे बोरी गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले आहे. दोन्ही गावांतील महिला आनंदाने सहभागी होतात. त्वेषाने शिवीगाळ होत असली तरी त्यानंतर प्रेमाने एकमेकांशी वागतात, असे तेथील लोक सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये